YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 2:31-45

दानीएल 2:31-45 MARVBSI

महाराज, आपण दृष्टान्त पाहिला त्यात एक मोठा पुतळा आपल्या नजरेस पडला. हा पुतळा भव्य व तेजःपुंज असा आपणापुढे उभा होता; त्याचे रूप विक्राळ होते. त्या पुतळ्याचे शीर उत्तम सोन्याचे, त्याची छाती व हात रुप्याचे, त्याचे पोट व मांड्या पितळेच्या, त्याचे पाय लोखंडाचे व त्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा व काही मातीचा होता. आपण स्वप्न पाहत असता, कोणाचा हात न लागता, एक पाषाण आपोआप सुटला व त्या पुतळ्याच्या लोखंडी व मातीच्या पावलांवर आदळून त्यांचे फुटून तुकडे-तुकडे झाले. तेव्हा लोखंड, माती, पितळ, रुपे व सोने ह्यांचे चूर्ण होऊन उन्हाळखळ्यातील भुसाप्रमाणे ती झाली. वार्‍याने ती उधळून नेली; त्यांचा मागमूस राहिला नाही; त्या पुतळ्यावर आदळलेल्या पाषाणाचा एक मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापली. हेच आपले स्वप्न; आता ह्याचा अर्थ राजाच्या हुजुरास आम्ही सांगतो. महाराज, आपण राजाधिराज असून आपल्याला स्वर्गीय देवाने राज्य, पराक्रम, बल व वैभव ही दिली आहेत; आणि जेथे जेथे मनुष्यजातीचा निवास आहे तेथील वनपशू व अंतराळातील पक्षी त्याने आपल्या अधीन केले आहेत, त्या सर्वांवर आपणास सत्ता चालवण्यास दिली आहे; सुवर्णाचे शीर आपणच आहात. आपल्यानंतर आपल्याहून कनिष्ठ असे राज्य उत्पन्न होईल; आणि पितळेचे असे तिसरे राज्य होईल; ते सर्व पृथ्वीवर सत्ता चालवील. चौथे राज्य लोखंडासारखे मजबूत होईल; लोखंड सर्वांचा भुगाभुगा करते तसे ते राज्य चूर्ण करणार्‍या लोखंडासारखे सर्वांचे चूर्ण करील. आपण त्या पुतळ्याची पावले व पावलांची बोटे पाहिली; त्यांचा काही भाग कुंभाराच्या मातीचा व काही भाग लोखंडाचा होता; तसे हे राज्य द्विविध होईल; तरी मातीत लोखंड मिसळलेले आपण पाहिले तशी त्या राज्यात लोखंडाची मजबुती राहील. त्या पुतळ्याच्या पावलांच्या बोटांचा काही भाग लोखंडाचा व काही भाग मातीचा होता; तसे ते राज्य अंशत: बळकट व अंशतः भंगुर असे होईल. लोखंड मातीबरोबर मिसळलेले आपण पाहिले तसे त्या राज्यातले लोक इतर लोकांबरोबर संबंध जोडतील; पण जसे लोखंड मातीबरोबर एकजीव होत नाही, तसे तेही त्यांच्याबरोबर एकजीव होणार नाहीत. त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसर्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते ह्या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांना नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल. आपण स्वप्नात असे पाहिले की कोणाचा हात न लागता त्या पर्वतापासून एक पाषाण आपोआप सुटला आणि त्याने लोखंड, पितळ, माती, रुपे व सोने ह्यांचे चूर्ण केले; त्यावरून पुढे काय होणार हे त्या थोर देवाने महाराजांच्या हुजुरास कळवले आहे; हेच आपले स्वप्न व त्याचा अर्थही निःसंशय हाच आहे.”