YouVersion लोगो
सर्च आयकॉन

कलस्सै 1:1-14

कलस्सै 1:1-14 MARVBSI

कलस्सै येथील पवित्र जनांना म्हणजे ख्रिस्तातील विश्वास ठेवणार्‍या बंधूंना, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल व बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून : देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो. ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास व तुमची सर्व पवित्र जनांवरील प्रीती, ह्यांविषयी ऐकून, आम्ही तुमच्यासाठी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे आम्ही सर्वदा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव ह्याची उपकारस्तुती करतो. ह्या आशेविषयी तुम्ही सुवार्तेच्या सत्य वचनात पूर्वी ऐकले. ही सुवार्ता तुमच्याकडे येऊन पोहचली आहे; तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले व खरेपणाने तिची माहिती करून घेतली, त्या दिवसापासून जशी तुमच्यामध्ये तशीच सर्व जगातही ही सुवार्ता फळ देत व वृद्धिंगत होत चालली आहे. एपफ्रास, आमच्या सोबतीचा प्रिय दास, तुमच्याकरता ख्रिस्ताचा विश्वासू सेवक, त्याच्यापासून तुम्ही ती कृपा अशीच शिकलात. आत्म्याच्या योगे उद्भवलेल्या तुमच्या प्रीतीविषयी त्यानेच आम्हांला कळवले. ह्यावरून आम्हीही ते ऐकल्या दिवसापासून तुमच्यासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की, सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्यांच्या द्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे; अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषवण्या-करता2 त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. सर्व प्रकारचा धीर व सहनशक्ती ही तुम्हांला आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे; आणि ज्याने तुम्हांला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले त्या पित्याची तुम्ही उपकारस्तुती करावी. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्या पुत्राच्या ठायी, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे.