असे बरेच दिवस चालले; तेव्हा यहूदी लोकांनी त्याला ठार मारण्याचा मनसुबा केला; पण त्यांचा तो कट शौलाला समजला. त्यांनी तर त्याला मारण्याकरता रात्रंदिवस वेशींवर पाळत ठेवली होती; परंतु त्याच्या शिष्यांनी रात्रीच्या वेळी त्याला नेले व पाटीत बसवून गावकुसावरून खाली उतरवले. मग तो यरुशलेमेत आला आणि शिष्यांबरोबर मिळण्यामिसळण्याचा प्रयत्न करू लागला; परंतु ‘हा शिष्य आहे’ असा त्यांचा विश्वास नसल्यामुळे ते सर्व त्याला भीत होते. तेव्हा बर्णबा त्याला घेऊन प्रेषितांकडे आला आणि त्याला वाटेत प्रभूचे दर्शन कसे झाले, प्रभू त्याच्याबरोबर कसा बोलला आणि येशूच्या नावाने दिमिष्कात त्याने धैर्याने कसे भाषण केले हे सर्व त्याने त्यांना सांगितले. तो यरुशलेमेत प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्यांच्याबरोबर जात येत असे; शिवाय तो हेल्लेणी यहूद्यांबरोबरही बोलत असे व वादविवाद करत असे; म्हणून ते त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागले. बंधुजनांना हे समजल्यावर त्यांनी त्याला कैसरीयात नेले व पुढे तार्सास पाठवले. अशा प्रकारे सर्व यहूदीया, गालील व शोमरोन ह्या प्रदेशांतील मंडळीस स्वस्थता मिळाली, आणि तिची उन्नती होऊन ती प्रभूच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली. मग असे झाले की, पेत्र चहूकडे फिरत असता लोद गावात जे पवित्र जन राहत होते त्यांच्याकडेही गेला. तेथे त्याला ऐनेयास नावाचा एक मनुष्य आढळला; त्याला पक्षाघात झाल्यामुळे तो आठ वर्षे अंथरुणाला खिळलेला होता. त्याला पेत्राने म्हटले, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करत आहे, ऊठ व स्वतः आपले अंथरूण नीटनेटके कर.” तेव्हा तो तत्काळ उठला. त्याला पाहून लोद व शारोन येथील सर्व रहिवासी प्रभूकडे वळले. यापोमध्ये टबीथा उर्फ दुर्कस1 ह्या नावाची कोणीएक शिष्या होती; ती सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर असे. पुढे असे झाले की, त्या दिवसांत ती आजारी पडून मरण पावली; तेव्हा त्यांनी तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवले. लोद यापोजवळ असल्यामुळे पेत्र तेथे आहे असे जेव्हा शिष्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी दोघा जणांस पाठवून त्याला विनंती केली की, “आमच्याकडे येण्यास उशीर करू नका.” तेव्हा पेत्र त्यांच्याबरोबर गेला. तो तेथे पोहचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले; त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या आणि दुर्कस त्यांच्याबरोबर होती तेव्हा ती जे अंगरखे व जी वस्त्रे करत असे ती त्यांनी त्याला दाखवली. पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली; मग कुडीकडे वळून म्हटले, “टबीथे, ऊठ.” तेव्हा तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली. मग त्याने तिला हात देऊन उठवले; आणि पवित्र जनांना व विधवांना बोलावून त्यांच्यापुढे तिला सजीव असे उभे केले. हे सर्व यापोमध्ये माहीत झाले; आणि पुष्कळांनी प्रभूवर विश्वास ठेवला. नंतर असे झाले की, तो यापोत शिमोन नावाच्या कोणाएका कातडे कमावणार्या चांभाराच्या येथे बरेच दिवस राहिला.
प्रेषितांची कृत्ये 9 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 9:23-43
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ