तेव्हा ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले. आणि फिलिप्पाने शोमरोन शहरात जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. तेव्हा फिलिप्पाचे भाषण ऐकून व तो करत असलेली चिन्हे पाहून लोकसमुदायांनी त्याने सांगितलेल्या गोष्टींकडे एकचित्ताने लक्ष दिले. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळांतून ते मोठ्याने ओरडून निघून गेले; पुष्कळ पक्षाघाती व पांगळी माणसे बरी झाली. आणि त्या नगरात आनंदीआनंद झाला. त्या नगरात जादूगिरी करून शोमरोनी लोकांना थक्क करणारा असा शिमोन नावाचा एक माणूस होता, आणि आपण कोणीतरी मोठे आहोत असे तो दाखवत असे. लहानापासून थोरापर्यंत सर्व जण त्याचे लक्षपूर्वक ऐकत व म्हणत की, “जिला देवाची महाशक्ती म्हणतात ती हा आहे.” त्याने त्यांना बर्याच दिवसांपासून आपल्या जादूगिरीने थक्क केले होते, म्हणून त्यांचे लक्ष त्याच्याकडे होते. तरीपण फिलिप्प देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्यांविषयीची सुवार्ता सांगत असता लोकांचा विश्वास बसला आणि पुरुष व स्त्रिया ह्यांचा बाप्तिस्मा झाला. स्वतः शिमोनानेही विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलिप्पाच्या सहवासात राहिला; आणि घडत असलेली चिन्हे व महापराक्रमाची कृत्ये पाहून तो थक्क झाला. मग शोमरोनाने देवाचे वचन स्वीकारले असे यरुशलेमेतल्या प्रेषितांनी ऐकून त्यांच्याकडे पेत्र व योहान ह्यांना पाठवले; ते तेथे आल्यावर त्यांनी त्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली; कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही तो उतरला नव्हता. प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा मात्र झाला होता. तेव्हा त्यांनी त्यांच्यावर आपले हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. मग प्रेषितांचे हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो हे पाहून शिमोनाने त्यांना पैसे देऊ करून म्हटले, “ज्या कोणावर मी आपले हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मलाही द्या.” तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, “तुझ्या रुप्याचा तुझ्याबरोबर नाश होवो, कारण द्रव्य देऊन देवाचे दान मिळवण्याचा तू विचार केलास. ह्या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही; कारण तुझे अंत:करण देवाच्या दृष्टीने नीट नाही. तू ह्या आपल्या दुष्टतेचा पश्चात्ताप करून प्रभूजवळ विनंती कर म्हणजे तुझ्या अंत:करणातल्या कल्पनेची तुला कदाचित क्षमा होईल. कारण तू अतिशय कटुतेत व अनीतीच्या बंधनात आहेस असे मला दिसते.” तेव्हा शिमोनाने म्हटले, “तुम्ही सांगितलेल्या गोष्टींपैकी काही माझ्यावर येऊ नये म्हणून माझ्यासाठी तुम्ही प्रभूजवळ विनंती करा.” नंतर त्यांनी साक्ष देऊन प्रभूचे वचन गाजवल्यावर ते यरुशलेमेत परत आले, आणि येताना त्यांनी शोमरोनी लोकांच्या पुष्कळशा गावांतून सुवार्ता सांगितली.
प्रेषितांची कृत्ये 8 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 8:4-25
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ