YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 7:44-60

प्रेषितांची कृत्ये 7:44-60 MARVBSI

तू ‘जो नमुना पाहिलास त्याप्रमाणे साक्षीचा मंडप कर,’ असे ‘ज्याने मोशेला सांगितले’ त्याने नेमल्याप्रमाणे तो मंडप रानात आपल्या पूर्वजांचा होता. जी राष्ट्रे देवाने त्यांच्यासमोरून घालवली त्यांचा देश आपल्या पूर्वजांनी आपल्या ‘ताब्यात घेतला’, तेव्हा तो मिळालेला मंडप त्यांनी यहोशवाबरोबर त्या देशात आणला आणि दाविदाच्या काळापर्यंत परंपरेने तसाच ठेवला. दाविदावर देवाची कृपादृष्टी झाली आणि त्याने ‘याकोबाच्या घराण्यासाठी1 वसतिस्थान मिळवण्याची’ विनंती केली, आणि ‘शलमोनाने त्याच्यासाठी घर बांधले’. तथापि जो परात्पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही; संदेष्ट्याने म्हटले आहे : परमेश्वर म्हणतो, ‘आकाश माझे राजासन आहे. पृथ्वी माझे पदासन आहे; तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते? माझ्या हाताने ह्या सर्व वस्तू केल्या नाहीत काय?’ अहो ‘ताठ मानेच्या’ आणि ‘हृदयांची व कानांची सुंता न झालेल्या लोकांनो,’ तुम्ही तर ‘पवित्र आत्म्याला’ सर्वदा ‘विरोध करता;’ जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही. ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान पुरुषाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले; आणि आता त्याला धरून देणारे व जिवे मारणारे तुम्ही निघाला आहात. अशा तुम्हांला देवदूतांच्या योगे योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते; पण तुम्ही ते पाळले नाही.” त्याचे हे भाषण ऐकणार्‍यांच्या अंतःकरणास इतके झोंबले की ते त्याच्यावर दातओठ खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला; आणि त्याने म्हटले, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.” तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. मग ते त्याला शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले; आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवली. ते दगडमार करत असता स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस.” असे बोलून तो झोपी गेला.

प्रेषितांची कृत्ये 7:44-60 साठी चलचित्र