हनन्या नावाचा कोणीएक इसम व त्याची बायको सप्पीरा ह्यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आलेल्या किंमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, “हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे? ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस? तू मनुष्यांशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस.” हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणार्या सर्वांना मोठे भय वाटले. नंतर तरुणांनी उठून त्याला गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. मग असे झाले की, सुमारे तीन तासांनी त्याची बायको आत आली तेव्हा झालेले वर्तमान तिला समजले नव्हते. पेत्र तिला म्हणाला, “मला सांग, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय?” तिने उत्तर दिले, “होय, एवढ्यालाच.” पेत्र तिला म्हणाला, “प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही संगनमत का केले? पाहा, ज्यांनी तुझ्या नवर्याला पुरले त्यांचे पाय दाराशीच आहेत; ते तुलाही उचलून बाहेर नेतील.” तेव्हा लगेचच तिने त्याच्या पायांजवळ पडून प्राण सोडला आणि तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या नवर्याजवळ पुरले. ह्यावरून सर्व मंडळीला व हे ऐकणार्या सर्वांना मोठे भय वाटले. प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुते घडत असत; आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनाच्या देवडीत जमत असत. आणि त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे, तरी लोक त्यांना थोर मानत असत. विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया ह्यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले; इतके की लोक दुखणेकर्यांना रस्त्यात आणून पलंगांवर आणि खाटांवर ठेवत; ह्यासाठी की, पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. आणखी यरुशलेमेच्या आसपासच्या चोहोकडल्या गावांतून लोकसमुदाय दुखणेकर्यांना व अशुद्ध आत्म्यांनी पिडलेल्यांना घेऊन तेथे येत असत; आणि ते सर्व बरे होत असत. तेव्हा प्रमुख याजक व त्याच्याबरोबर असलेले सर्व सदूकपंथी मत्सराने उठले आणि त्यांनी प्रेषितांना अटक करून तुरुंगात घातले. परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले, “जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाची सर्व वचने लोकांना सांगा.” हे ऐकून उजाडताच ते मंदिरामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले. इकडे, प्रमुख याजक व त्याच्याबरोबर जे होते त्यांनी येऊन न्यायसभा व इस्राएल लोकांचे संपूर्ण वडीलमंडळ एकत्र बोलावले आणि त्यांना आणण्यास बंदिशाळेकडे पाठवले.
प्रेषितांची कृत्ये 5 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 5:1-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ