असे आम्ही निभावल्यावर त्या बेटाचे नाव मिलिता आहे असे आम्हांला समजले. तेथील बर्बर1 लोकांनी आमच्यावर विशेष उपकार केले; म्हणजे पाऊस व गारठा असल्यामुळे त्यांनी शेकोटी पेटवून आम्हा सर्वांचा पाहुणचार केला. तेव्हा पौलाने काटक्यांची मोळी आणून शेकोटीवर घातली. इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक साप बाहेर निघून त्याच्या हातास झोंबून राहिला. ते जिवाणू त्याच्या हाताला लटकलेले पाहून बर्बर1 लोक एकमेकांना म्हणू लागले, “खरेच, हा माणूस घातकी आहे; हा समुद्रातून वाचला तरी न्यायदेवता त्याला जगू देत नाही.” त्याने तर ते जिवाणू विस्तवात झटकून टाकले आणि त्याला काही इजा झाली नाही. तो सुजेल किंवा एकाएकी मरून पडेल ह्याची ते वाट पाहत होते; पण बराच वेळ वाट पाहिल्यावर त्याला काही विकार झाला नाही असे पाहून ते आपले मत बदलून म्हणाले, ‘हा कोणी देव आहे.’ इकडे त्या बेटावरील पुब्ल्य नावाच्या मुख्य अधिकार्याच्या जमिनी आसपास होत्या; त्याने आमचे आगतस्वागत करून तीन दिवस आदराने आमचा पाहुणचार केला. तेव्हा असे झाले की, पुब्ल्याचा बाप तापाने व आवरक्ताने आजारी पडला होता; त्याच्याकडे आत जाऊन पौलाने प्रार्थना केली व त्याच्यावर हात ठेवून त्याला बरे केले. हे झाल्यावर त्या बेटामध्ये ज्या दुसर्या लोकांना रोग होते तेही त्याच्याकडे येऊन बरे होऊन जात. तेव्हा त्यांनी आमचा नाना प्रकारे सन्मान केला आणि आम्ही हाकारून निघालो तेव्हा आमच्या गरजेचे पदार्थ त्यांनी जहाजावर भरले. ह्याप्रमाणे तीन महिन्यांनंतर आलेक्सांद्रियाचे दयस्कुरै2 ह्या निशाणीचे एक तारू हिवाळा घालवण्याकरता त्या बेटाजवळ राहिले होते, त्यात बसून आम्ही निघालो. मग सुराकूस येथे वरवा करून आम्ही तीन दिवस राहिलो. तेथून वळसा घेऊन आम्ही रेगियोनास आलो; आणि एक दिवसानंतर दक्षिणेचा वारा सुटल्यावर दुसर्या दिवशी आम्ही पुत्युलास पोहचलो. तेथे आम्हांला बंधुजन भेटले; त्यांनी आपल्या येथे सात दिवस राहण्याची आम्हांला विनंती केली; अशा रीतीने आम्ही रोम शहरास आलो. तेथील बंधुजन आमच्याविषयी ऐकून अप्पियाची पेठ व तीन उतारशाळा येथपर्यंत आम्हांला सामोरे आले; त्यांना पाहून पौलाने देवाची उपकारस्तुती करून धैर्य धरले.
प्रेषितांची कृत्ये 28 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 28
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 28:1-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ