नंतर आम्ही इटली देशास तारवातून जावे असे ठरल्यावर पौलाला व दुसर्या कित्येक बंदिवानांना बादशाही पलटणीचा यूल्य नावाचा शताधिपती ह्याच्या स्वाधीन करण्यात आले. तेव्हा आम्ही आशिया प्रांताच्या किनार्यावरील बंदरे करणार्या अद्रमुत्तीय नगराच्या एका तारवात बसून निघालो; तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीकाचा अरिस्तार्ख आमच्याबरोबर होता. दुसर्या दिवशी आम्ही सीदोनास पोहचलो, तेव्हा यूल्याने पौलाबरोबर सौजन्याने वागून त्याच्या मित्रांनी त्याचा पाहुणचार करावा म्हणून त्यांच्याकडे जाण्यास त्याला परवानगी दिली. मग आम्ही तेथून निघाल्यावर वारा तोंडचा असल्यामुळे कुप्राच्या किनार्यावरून गेलो. नंतर किलिकिया व पंफुल्या ह्यांच्यासमोरच्या समुद्रावरून जाऊन आम्ही लुक्या प्रांतातील मुर्या बंदरास पोहचलो. तेथे इटलीस जाणारे एक आलेक्सांद्रियाचे तारू शताधिपतीला मिळाले; त्यावर त्याने आम्हांला चढवले. मग पुष्कळ दिवसपर्यंत हळूहळू जात असता मोठ्या प्रयासाने कनिदासमोर आल्यावर वारा पुढे जाऊ देईना, म्हणून आम्ही क्रेताच्या किनार्यावरून सलमोनासमोर गेलो. मग आम्ही मोठ्या प्रयासाने त्याच्या काठाकाठाने सुंदर बंदर नावाच्या ठिकाणी आलो; त्याच्याजवळ लसया नगर होते. तेव्हा फार दिवस झाल्यामुळे आणि तितक्यात उपासाचे दिवसही होऊन गेल्यामुळे त्या वेळेस समुद्रावरून जाणे संकटाचे होते, म्हणून पौल त्यांना असे सुचवत होता की, “अहो गृहस्थांनो, ह्या जलप्रवासात केवळ मालाचे आणि तारवाचे नुकसान नव्हे, तर आपल्या जिवांचेही हाल होऊन मोठी हानी होईल असे मला दिसते.” तथापि शताधिपतीने पौलाच्या म्हणण्यापेक्षा तांडेल व तारवाचा धनी ह्यांच्याकडे अधिक लक्ष दिले. ते बंदर हिवाळ्यात राहायला सोईचे नव्हते म्हणून बहुतेकांनी मसलत दिली की, तेथून निघावे आणि साधेल तर क्रेतातील फेनिके बंदरात जाऊन तेथे हिवाळा घालवावा; हे नैऋत्याभिमुख व वायव्याभिमुख आहे. मग दक्षिणेचा वारा मंद वाहत असल्यामुळे आपला बेत सिद्धीस गेलाच असे समजून, ते तेथून नांगर उचलून काठाकाठाने क्रेताच्या बाजूने गेले. परंतु थोड्या वेळानंतर युरकुलोन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला; त्यात तारू सापडून वार्याच्या तोंडी ठरेना, म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन होऊन वाहवत चाललो. मग कौदा नावाच्या एका लहान बेटावरून जाताना आम्ही मोठ्या प्रयासाने होडी आपल्या स्वाधीन करून घेतली. ती वर घेतल्यावर त्यांनी साहित्यांची योजना करून तारू खालून आवळून बांधले; आणि आपण सुर्ती नावाच्या भाटीवर जाऊन आदळू असे त्यांना भय वाटले म्हणून त्यांनी शीड उतरले; मग ते तसेच वाहवत गेले. तेव्हा वादळाने आमचे फार हाल होऊ लागल्यामुळे ते दुसर्या दिवशी भरगत टाकून देऊ लागले; आणि तिसर्या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार टाकून दिले. मग पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत आणि तुफानाचा जोर आम्हांला फारच भासला; त्यामुळे शेवटी आमची तरण्याची आशा हळूहळू सोडून द्यावी लागली. तेव्हा त्यांना पुष्कळ दिवस उपास पडल्यावर पौल त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, “गृहस्थहो, तुम्ही माझे ऐकायचे होते, क्रेताहून निघायचे नव्हते, म्हणजे हे हाल व ही हानी टळली असती. तरी मी आता तुम्हांला सांगतो की, धैर्य धरा; तुमच्यापैकी कोणाच्याही जिवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल; कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, ‘पौला, भिऊ नकोस; तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे; आणि पाहा, तुझ्याबरोबर जे तारवातून चालले आहेत ते सर्व देवाने तुला दिले आहेत.’ म्हणून गृहस्थांनो, धैर्य धरा; माझा देवावर भरवसा आहे की त्याने मला जसे कळवले तसेच घडेल. तथापि आपल्याला एका बेटावर पडावे लागेल.”
प्रेषितांची कृत्ये 27 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 27
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 27:1-26
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ