मग पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टी करून म्हणाला, “बंधुजनहो, मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे.” तेव्हा प्रमुख याजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणार्यांना त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली. तेव्हा पौल त्याला म्हणाला, “हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील; तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करायला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याची आज्ञा देतोस काय?” तेव्हा जवळ उभे राहणारे म्हणाले, “तू देवाच्या प्रमुख याजकाची निंदा करतोस काय?” पौलाने म्हटले, “बंधुजनहो, हा प्रमुख याजक आहे हे मला ठाऊक नव्हते; कारण ‘तू आपल्या लोकांच्या अधिकार्याविरुद्ध वाईट बोलू नकोस’ असे शास्त्रात लिहिले आहे.” तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदूकी व एक भाग परूशी आहे, हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, “बंधुजनहो, मी परूशी व परूश्यांचा पुत्र आहे; आमची आशा व मेलेल्यांचे पुनरुत्थान ह्यासंबंधाने माझी चौकशी होत आहे.” तो असे बोलला तेव्हा परूशी व सदूकी ह्यांच्यात भांडण लागून लोकांत फूट पडली. कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही, असे सदूकी म्हणतात; परूशी तर ह्या दोन्ही गोष्टी मान्य करतात. तेव्हा मोठी गडबड उडाली; आणि जे शास्त्री परूश्यांच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काही जण उठून तणतण करत म्हणाले, “ह्या माणसाच्या ठायी आम्हांला काही वाईट दिसत नाही; जर आत्मा किंवा देवदूत त्याच्याबरोबर बोलला असेल तर मग कसे? [आपण देवाशी भांडू नये].” असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकूम केला की, खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून गढीत आणावे. त्याच रात्री प्रभू त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, “धीर धर; जशी तू यरुशलेमेत माझ्याविषयी साक्ष दिलीस तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल.” मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणारपिणार नाही.” हा कट रचणारे इसम चाळीसहून अधिक होते. ते मुख्य याजक व वडील ह्यांच्याकडे येऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही अन्नाला शिवणार नाही, अशा कडकडीत शपथेने आम्ही स्वतःला बद्ध करून घेतले आहे. तर आता त्याच्याविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करायची आहे, ह्या निमित्ताने त्याला आपणाकडे आणावे असे तुम्ही न्यायसभेसहित सरदाराला समजवावे; म्हणजे तो जवळ येतो न येतो तोच त्याचा जीव घेण्यास आम्ही तयार आहोत.”
प्रेषितांची कृत्ये 23 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 23
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 23:1-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ