YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 20:1-16

प्रेषितांची कृत्ये 20:1-16 MARVBSI

नंतर गलबला निवाल्यावर पौलाने शिष्यांना बोलावून त्यांना बोध केला, व त्यांचा निरोप घेऊन तो मासेदोनियास जाण्यास निघाला. त्या प्रांतातून जाताना तेथल्या लोकांना पुष्कळ बोध करून तो हेल्लास प्रांतात गेला. तेथे तीन महिने राहिल्यावर तो सूरिया देशात तारवातून जाणार होता, पण यहूदी लोकांनी त्याच्याविरुद्ध कट केला, तेव्हा त्याने मासेदोनियातून परत जाण्याचा बेत केला. पुर्राचा मुलगा सोपत्र बिरुयाकर, थेस्सलनीकाकरांतले अरिस्तार्ख व सकूंद, गायस दर्बेकर, तीमथ्य आणि आशिया प्रांतातील तुखिक व त्रफिम हे त्याच्याबरोबर आशियापर्यंत गेले. ते पुढे जाऊन त्रोवसात आमची वाट पाहत राहिले; आणि बेखमीर भाकरीच्या दिवसांनंतर आम्ही फिलिप्पैहून तारवात बसून पाच दिवसांनी त्रोवसात त्यांच्याकडे आलो. तेथे आम्ही सात दिवस राहिलो. मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो तेव्हा पौलाने त्यांच्याबरोबर भाषण केले; तो दुसर्‍या दिवशी जाणार होता आणि त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबवले. ज्या माडीवर आम्ही एकत्र जमलो होतो तेथे बरेच दिवे होते. आणि युतुख नावाचा कोणीएक तरुण खिडकीत बसला असता झोपेने गुंगला होता. तेव्हा पौल फार वेळ भाषण करत राहिल्यामुळे तो झोपेच्या गुंगीत तिसर्‍या मजल्यावरून खाली पडला व मेलेला हाती लागला. तेव्हा पौल खाली उतरला आणि त्याच्यावर पाखर घालून व त्याला कवटाळून म्हणाला, “घाबरू नका; कारण हा अजून जिवंत आहे.” मग त्याने वर येऊन भाकर मोडून खाल्ल्यावर बराच वेळ म्हणजे पहाटपर्यंत त्यांच्याबरोबर संभाषण केले व तो तसाच निघून गेला. त्या तरुणाला जिवंत नेता आल्यामुळे त्यांना फार समाधान वाटले. आम्ही आधीच जाऊन तारवात बसून अस्साकडे गेलो, तेथे पोहचल्यावर पौलाला तारवात घ्यायचे होते; कारण त्याने तसे ठरवले होते व तो स्वतः पायवाटेने येणार होता. तो अस्सात आम्हांला भेटला, तेव्हा त्याला तारवात घेऊन आम्ही मितुलेनास आलो. तेथून तारवातून आम्ही दुसर्‍या दिवशी खियासमोर आलो, आणि त्याच्या पुढल्या दिवशी आम्ही सामा बंदर घेतले; मग [त्रोगुल्यात राहिल्यावर] त्याच्या पुढील दिवशी आम्ही मिलेतास आलो. आपल्याला आशिया प्रांतामध्ये फार दिवस राहावे लागू नये म्हणून इफिस बाजूला टाकून जाण्याचा पौलाने निश्‍चय केला होता; कारण कसेही करून पन्नासाव्या दिवसाच्या सणात1 आपण यरुशलेमेत असावे ह्यासाठी तो घाई करत होता.

प्रेषितांची कृत्ये 20:1-16 साठी चलचित्र