YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 2:25-41

प्रेषितांची कृत्ये 2:25-41 MARVBSI

दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, ‘मी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे; मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे; म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्लसित झाली; आणि माझा देहही आशेवर राहील. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचे मार्ग तू मला कळवले आहेत; तू आपल्या समक्षतेने मला हर्षभरित करशील.’ बंधुजनहो, कुलाधिपती दावीद ह्याच्याविषयी मी तुमच्याबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की, देव ‘शपथ वाहून त्याला म्हणाला, देहाप्रमाणे तुझ्या संतानांतील एकाला (म्हणजे ख्रिस्ताला) तुझ्या राजासनावर बसवण्यासाठी मी उठवीन.’ ह्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थाना-विषयी असे बोलला की, ‘त्याला अधोलोकात सोडून दिले नाही’ व त्याच्या देहाला ‘कुजण्याचा अनुभव आला नाही.’ त्या येशूला देवाने उठवले ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसवलेला आहे, त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे. कारण दावीद स्वर्गास चढून गेला नाही; पण तो स्वत: म्हणतो, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की, मी तुझ्या शत्रूंचे तुझ्या पायांसाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’ म्हणून इस्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्‍चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.” हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, आम्ही काय करावे?” पेत्र त्यांना म्हणाला, “पश्‍चात्ताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हांला, तुमच्या मुलाबाळांना व ‘जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर’ आपला देव ‘स्वतःकडे बोलावील तितक्यांना’ दिले आहे.” आणखी त्याने दुसर्‍या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली व बोध करून म्हटले, “ह्या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.” तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली.

प्रेषितांची कृत्ये 2:25-41 साठी चलचित्र