हे झाल्यावर मासेदोनिया व अखया ह्या प्रांतांतून यरुशलेमेस जावे असा पौलाने आपल्या मनात निश्चय करून म्हटले, “तेथे गेल्यावर मला रोम शहरही पाहिले पाहिजे.” मग आपली सेवा करणार्यांपैकी तीमथ्य व एरास्त ह्या दोघांना मासेदोनियास पाठवून तो स्वतः काही दिवस आशिया प्रांतात राहिला. ह्या सुमारास त्या मार्गाविषयी बरीच खळबळ उडाली. कारण देमेत्रिय नावाचा कोणीएक सोनार अर्तमी देवीचे रुप्याचे देव्हारे करून कारागिरांना बराच कामधंदा मिळवून देत असे. त्याने त्यांना व तसल्याच इतर कारागिरांना एकत्र जमवून म्हटले, “गड्यांनो, ह्या धंद्यात आपल्याला पैसे मिळतात हे तुम्हांला ठाऊकच आहे. तुम्ही पाहता व ऐकता की, हातांनी केलेले देव हे देवच नाहीत असे ह्या पौलाने केवळ इफिसातच नव्हे तर बहुतेक सर्व आशिया प्रांतात बोलून व पुष्कळ लोकांच्या मनात भरवून त्यांना फितवले आहे. ह्यामुळे ह्या आपल्या धंद्याची बदनामी होण्याचा धोका आहे; इतकेच नव्हे, तर ज्या महादेवी अर्तमीची पूजा सर्व आशिया प्रांत किंबहुना जगसुद्धा करते तिचे देऊळ क:पदार्थ ठरण्याचा व तिचे स्वतःचे महत्त्व नष्ट होण्याचा धोका आहे.” हे ऐकल्यावर ते क्रोधाविष्ट होऊन ओरडू लागले की, “इफिसकरांची अर्तमी थोर!” इतक्यात नगरात गोंधळ उडाला; आणि पौलाचे वाटेतले सोबती, मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख ह्यांना पकडून त्यांना ओढत ओढत ते एकजुटीने नाटकगृहात धावत गेले. तेव्हा गर्दीत जावे असे पौलाच्या मनात होते, पण शिष्यांनी त्याला जाऊ दिले नाही. शिवाय आशिया प्रांताच्या अधिकार्यांपैकी कित्येक जण त्याचे मित्र होते, त्यांनीही त्याला निरोप पाठवून आग्रह केला की, नाटकगृहात जाऊन स्वत:ला धोक्यात घालू नका. तेव्हा कोणी काही, कोणी काही अशा आरोळ्या मारू लागले; लोकांचा एकच गोंधळ उडाला; आणि आपण कशाला जमलो आहोत हे बहुतेकांना कळले नाही. मग आलेक्सांद्राला यहूदी लोकांनी पुढे केल्यावर कित्येकांनी त्याला गर्दीतून बाहेर ओढले; तेव्हा आलेक्सांद्र हाताने खुणावून लोकांची समजूत घालू पाहत होता; परंतु तो यहूदी आहे असे समजल्यावर, सुमारे दोन तासपर्यंत, “इफिसकरांची अर्तमी थोर!” अशी सर्वांची एकच आरोळी झाली. मग नगराचा शिरस्तेदार लोकांना शांत करून म्हणाला, “अहो इफिसकरांनो, महान अर्तमीचे देऊळ व आकाशातून पडलेल्या मूर्ती ह्यांचे इफिस नगर हे संरक्षक आहे, हे ज्याला ठाऊक नाही असा कोण माणूस आहे? ह्या गोष्टी निर्विवाद आहेत म्हणून तुम्ही शांत असावे, काही उतावळी करू नये. कारण जी माणसे तुम्ही येथे आणली आहेत ती देवळे लुटणारी किंवा आपल्या देवीची निंदा करणारी नाहीत. म्हणून देमेत्रिय व त्याच्या सोबतीचे कारागीर ह्यांचा कोणाशी वाद असल्यास न्यायगृहे उघडी आहेत व न्यायाधीशही आहेत; त्यांच्यापुढे त्यांनी एकमेकांवर फिर्यादी कराव्यात. पण ह्यापलीकडे तुमची काही मागणी असली तर तिच्याबद्दल कायदेशीर सभेत ठरवले जाईल. ह्या दंगलीचे कारण काय ह्याचा जबाब आपल्याला देता येण्यासारखा नसल्यामुळे आजच्या प्रसंगावरून आपल्यावर बंड केल्याचा आरोप येण्याचे भय आहे.” असे बोलून त्याने सभा बरखास्त केली.
प्रेषितांची कृत्ये 19 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 19
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 19:21-41
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ