नंतर ते अंफिपुली व अपुल्लोनिया ह्यांच्यामधून जाऊन थेस्सलनीकास गेले. तेथे यहूद्यांचे सभास्थान होते. तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांच्याकडे जाऊन तीन शब्बाथ त्यांच्याबरोबर शास्त्रावरून वादविवाद केला. त्याने शास्त्राचा उलगडा करून असे प्रतिपादन केले की, “ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यांमधून पुन्हा उठावे ह्याचे अगत्य होते, आणि ज्या येशूची मी तुमच्यापुढे घोषणा करत आहे तोच तो ख्रिस्त आहे.” तेव्हा त्यांच्यापैकी काही जणांची खातरी होऊन ते पौल व सीला ह्यांना येऊन मिळाले; आणि भक्तिमान हेल्लेणी ह्यांचा मोठा समुदाय त्यांना मिळाला. त्यात प्रमुख स्त्रिया काही थोड्याथोडक्या नव्हत्या. परंतु ज्या यहूद्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांनी हेव्याने आपणांबरोबर बाजारचे काही गुंड लोक घेऊन व घोळका जमवून नगरात घबराट निर्माण केली, आणि यासोनाच्या घरावर हल्ला करून त्यांना लोकांकडे बाहेर काढून आणण्याची खटपट करून पाहिली. परंतु त्यांचा शोध लागला नाही तेव्हा त्यांनी यासोनाला व कित्येक बंधूंना नगराच्या अधिकार्यांकडे ओढत नेऊन आरडाओरड करत म्हटले, “ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेही आले आहेत; त्यांना यासोनाने आपल्या घरात घेतले आहे, आणि हे सर्व जण कैसराच्या हुकमांविरुद्ध वागतात, म्हणजे येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे असे म्हणतात.” हे ऐकवून त्यांनी लोकांना व शहराच्या अधिकार्यांना खवळवून सोडले. मग त्यांनी यासोनाचा व इतरांचा जामीन घेऊन त्यांना सोडून दिले. नंतर बंधुजनांनी पौल व सीला ह्यांना लगेच रातोरात बिरुयास पाठवले. ते तेथे पोहचल्यावर यहूद्यांच्या सभास्थानात गेले. तेथील लोक थेस्सलनीकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करत गेले. त्यांतील अनेकांनी व बर्याच प्रतिष्ठित हेल्लेणी स्त्रिया व पुरुष ह्यांनी विश्वास ठेवला. तरीपण पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे हे थेस्सलनीकातल्या यहूद्यांना समजले, तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांना खवळवून चेतवले. त्यावरून बंधुजनांनी पौलाला समुद्राकडे जाण्यास लगेच पाठवले; आणि सीला व तीमथ्य हे तेथेच राहिले. तेव्हा पौलाला पोहचवणार्यांनी त्याला अथेनैपर्यंत नेले, आणि सीला व तीमथ्य ह्यांनी आपल्याकडे होईल तितक्या लवकर यावे अशी त्यांची आज्ञा घेऊन ते निघाले.
प्रेषितांची कृत्ये 17 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 17
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 17:1-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ