तेव्हा त्रोवसापासून हाकारून आम्ही नीट समथ्राकेस गेलो व दुसर्या दिवशी नियापुलीस गेलो; तेथून फिलिप्पैस गेलो; ते मासेदोनियाचे ह्या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमी लोकांची वसाहत आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो. मग शब्बाथ दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी, जेथे प्रार्थना होत असते असे आम्हांला वाटले तेथे जाऊन बसलो; आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो. तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती; ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकत असे; ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले; तिचे अंत:करण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की, “मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानत आहात तर माझ्या घरी येऊन राहा.” तिच्या आग्रहास्तव ती विनंती आम्हांला मान्य करावी लागली. मग असे झाले की, आम्ही प्रार्थनास्थळाकडे जात असता कोणीएक मुलगी आम्हांला आढळली. तिच्या अंगात येत असे. ती दैवप्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे. ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, “हे लोक परात्पर देवाचे दास आहेत; हे तुम्हांला तारणाचा मार्ग कळवतात.” असे ती पुष्कळ दिवस करत असे; मग पौलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या पिशाच्चाला म्हणाला, “येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की, तू हिच्यामधून निघून जा.” आणि ते तत्काळ निघून गेले. मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्यांनी पौल व सीला ह्यांना धरून पेठेत अंमलदाराकडे ओढून नेले. आणि त्यांनी त्यांना अधिकार्यांपुढे उभे करून म्हटले, “हे लोक यहूदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात, आणि आम्हा रोमी लोकांना जे परिपाठ स्वीकारायला व आचरायला योग्य नाहीत ते हे सांगतात.” तेव्हा लोक त्यांच्यावर उठले; आणि अधिकार्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारण्याची आज्ञा दिली. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदिशाळेत टाकून त्यांनी बंदिशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यांत अडकवले. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले; सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदिशाळेचे दरवाजे उघडे पाहिले; आणि बंदिवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून आपला घात करणार होता. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, “तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस; कारण आम्ही सर्व जण येथेच आहोत.” मग दिवे आणवून तो आत धावत गेला, कापत कापत पौल व सीला ह्यांच्या पाया पडला, आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, “महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे?” ते म्हणाले, “प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या; आणि तेव्हाच त्याने व त्याच्या घरच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतला. मग त्याने त्यांना घरी नेऊन जेवू घातले आणि देवावर विश्वास ठेवून त्याने व त्याच्या घरच्या सर्व मंडळीने आनंदोत्सव केला. दिवस उगवल्यावर अधिकार्यांनी चोपदारांना पाठवून सांगितले की, “त्या माणसांना सोडून दे.” तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने पौलाला असे वर्तमान सांगितले की, “तुम्हांला सोडावे म्हणून अधिकार्यांनी माणसे पाठवली आहेत; तर आता शांतीने जा.” परंतु पौल त्यांना म्हणाला, “आम्ही रोमी माणसे असता अपराधी ठरवल्यावाचून त्यांनी आम्हांला उघडपणे फटके मारून बंदिशाळेत टाकले आणि आता ते आम्हांला गुप्तपणे घालवतात काय? हे चालणार नाही; तर त्यांनी स्वतः येऊन आम्हांला बाहेर काढावे.” मग चोपदारांनी हे वर्तमान अधिकार्यांना सांगितले. तेव्हा ते रोमी आहेत हे ऐकून त्यांना भय वाटले. मग त्यांनी येऊन त्यांची समजूत घातली; आणि त्यांना बाहेर आणून नगरातून निघून जाण्याची विनंती केली. मग ते बंदिशाळेतून निघून लुदियेच्या घरी गेले, बंधुजनांस भेटून त्यांनी त्यांना धीर दिला आणि तेथून ते मार्गस्थ झाले.
प्रेषितांची कृत्ये 16 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 16
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 16:11-40
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ