YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 15:1-21

प्रेषितांची कृत्ये 15:1-21 MARVBSI

तेव्हा काही जणांनी यहूदीयाहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली की, “मोशेने लावून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची सुंता झाल्यावाचून तुमचे तारण होणे शक्य नाही.” तेव्हा पौल व बर्णबा ह्यांचा त्यांच्याशी बराच मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरवण्यात आले की, पौल व बर्णबा ह्यांनी व त्यांच्यापैकी इतर काहींनी ह्या वादासंबंधाने यरुशलेमेतले प्रेषित व वडीलवर्ग ह्यांच्याकडे जावे. मग मंडळीने त्यांची बोळवण केल्यावर ते फेनिके व शोमरोन ह्यांमधून गेले, आणि परराष्ट्रीय देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले. नंतर ते यरुशलेमेस पोहचल्यावर तेथील मंडळी, प्रेषित व वडीलवर्ग ह्यांनी त्यांचे आगतस्वागत केले. तेव्हा आपण देवाच्या सहवासात असताना देवाने जे जे केले ते त्यांनी सांगितले. तरीपण परूशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे पुढे होऊन म्हणाले, “त्यांची सुंता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळण्याची त्यांना आज्ञा केलीच पाहिजे.” मग प्रेषित व वडीलवर्ग ह्या प्रकरणाचा विचार करण्यास जमले. तेव्हा पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला, “बंधुजनहो, तुम्हांला ठाऊक आहे की, माझ्या तोंडून सुवार्ता ऐकून परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीच्या दिवसांपासून तुमच्यामध्ये देवाने माझी निवड केली. आणि हृदये जाणणार्‍या देवाने जसा आपल्याला तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली. त्याने त्यांची अंत:करणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही. असे असताना जे जोखड आपले पूर्वज व आपणही वाहण्यास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालून तुम्ही देवाची परीक्षा का पाहता? तर मग त्यांच्याप्रमाणेच आपलेही तारण प्रभू येशूच्या कृपेने होईल असा आपला विश्वास आहे. तेव्हा सर्व लोक गप्प राहिले, आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्या द्वारे देवाने परराष्ट्रीयांमध्ये जी जी चिन्हे व अद्भुते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले. मग त्यांचे भाषण संपल्यावर याकोब म्हणाला, “बंधुजनहो, माझे ऐका. परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरता काही लोक काढून घ्यावेत म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली, हे शिमोनाने सांगितले आहे; आणि ह्याच्याशी संदेष्ट्यांच्या उक्तींचाही मेळ बसतो. असा शास्त्रलेख आहे की, ‘ह्यानंतर मी परत येईन, व दाविदाचा पडलेला डेरा पुन्हा उभारीन; आणि त्याची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करीन; ह्यासाठी की, शेष राहिलेल्या माणसांनी, व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा; हे जे त्याला युगादिपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो.’ तेव्हा माझे तर मत असे आहे की, जे परराष्ट्रीयांतून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये; तर त्यांना असे लिहून पाठवावे की, मूर्तींचे अमंगळपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी व रक्त ह्यांपासून तुम्ही अलिप्त असा. कारण प्राचीन काळापासून दर शब्बाथ दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून दाखवून त्याची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरात आहेत.”

प्रेषितांची कृत्ये 15:1-21 साठी चलचित्र