अंत्युखियाच्या मंडळीत बर्णबा, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, जो बाळपणापासून मांडलिक हेरोद राजाबरोबर वाढला होता तो मनाएन व शौल हे संदेष्टे व शिक्षक होते. ते प्रभूची सेवा व उपास करत असता पवित्र आत्मा म्हणाला की, “बर्णबा व शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करून ठेवा.” तेव्हा त्यांनी उपास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. ह्याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकीयात येऊन तारवातून कुप्रास गेले. मग ते सलमीनात असता त्यांनी यहूद्यांच्या सभास्थानामध्ये देवाच्या वचनाची घोषणा केली; आणि योहान हाही त्यांचा सहायक होता. पुढे ते सबंध बेटातून चालून पफेस गेल्यावर बर्येशू नावाचा कोणीएक यहूदी जादूगार व खोटा संदेष्टा त्यांना आढळला. तो तेथील सुभेदार सिर्ग्य पौल ह्या बुद्धिमान मनुष्याच्या पदरी होता. ह्या सुभेदाराने बर्णबा व शौल ह्यांना बोलावून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दर्शवली. परंतु अलीम जादूगार (त्याच्या नावाचा अर्थ हाच आहे) ह्याने त्यांना अडवून सुभेदाराला विश्वासापासून फितवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शौल, ज्याला पौलही म्हणत, तो पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, “अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा, अवघ्या नीतिमत्त्वाच्या वैर्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय? तर पाहा, आता प्रभूचा हात तुला प्रतिकूल आहे, तू आंधळा होशील, व काही वेळपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही.” तत्क्षणीच त्याच्यावर धुके पडल्यासारखे होऊन त्याच्या डोळ्यांना अंधारी आली; तेव्हा आपल्याला कोणीतरी हात धरून न्यावे म्हणून तो इकडे तिकडे माणसांचा शोध करू लागला. तेव्हा जे झाले ते पाहून त्या सुभेदाराने प्रभूच्या शिक्षणावरून आश्चर्य करून विश्वास ठेवला.
प्रेषितांची कृत्ये 13 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 13
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 13:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ