YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 10:1-23

प्रेषितांची कृत्ये 10:1-23 MARVBSI

कैसरीया येथे कर्नेल्य नावाचा कोणीएक पुरुष इटलिक म्हटलेल्या पलटणीत शताधिपती होता. तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकांना फार दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता. त्याने दिवसाच्या सुमारे तिसर्‍या प्रहरी दृष्टान्तात असे स्पष्टपणे पाहिले की, आपणाकडे देवाचा दूत येत असून “कर्नेल्या,” अशी आपणास हाक मारत आहे. तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, “काय महाराज?” त्याने त्याला म्हटले, “तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत. तर आता यापोस माणसे पाठव आणि शिमोन नावाच्या माणसाला बोलावून आण; त्याला पेत्रही म्हणतात. तो शिमोन नावाच्या कोणाएका कातडे कमावणार्‍या चांभाराच्या येथे उतरला आहे; त्याचे घर समुद्राच्या किनार्‍यास आहे. [तुला काय करावे लागेल हे तो तुला सांगेल.]” जो देवदूत त्याच्याबरोबर बोलत होता तो निघून गेल्यानंतर त्याने आपल्या घरच्या दोघा चाकरांना व आपल्या हुजरातीतल्या एका भक्तिमान शिपायाला बोलावले; आणि त्यांच्याजवळ सर्व सविस्तर सांगून त्यांना यापोस पाठवले. ते दुसर्‍या दिवशी वाटेवर असता गावाजवळ येताना दोन प्रहराच्या सुमारास पेत्र प्रार्थना करण्यास धाब्यावर गेला. तेव्हा त्याला भूक लागून काही खावेसे वाटले; आणि जेवणाची तयारी होत आहे इतक्यात त्याचे देहभान सुटले. तेव्हा आकाश उघडलेले व मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे असा दृष्टान्त त्याला झाला. त्यात पृथ्वीवरील सर्व चतुष्पाद, सरपटणारे जीव व आकाशातील पाखरे होती. मग त्याने अशी वाणी ऐकली की, ‘पेत्रा, ऊठ; मारून खा.’ पेत्र म्हणाला, “नको, नको, प्रभू; कारण निषिद्ध आणि अशुद्ध असे काही मी कधीही खाल्ले नाही.” मग दुसर्‍यांदा अशी वाणी झाली की, “देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नकोस.” असे तीन वेळा झाले आणि लगेच ते पात्र आकाशात वर घेतले गेले. आपण पाहिलेल्या दृष्टान्ताचा अर्थ काय असावा ह्याविषयी पेत्र विचारात पडला असता, पाहा, कर्नेल्याने पाठवलेली माणसे शिमोनाचे घर शोधल्यावर दरवाजाजवळ येऊन उभी राहिली; आणि त्यांनी हाक मारून विचारले, “शिमोन पेत्र येथे पाहुणा उतरला आहे काय?” पेत्र त्या दृष्टान्ताविषयी विचार करत असता आत्मा त्याला म्हणाला, “पाहा, तीन माणसे तुझा शोध करत आहेत. तर ऊठ, खाली ये आणि काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा; कारण मीच त्यांना पाठवले आहे.” पेत्र त्या माणसांकडे खाली येऊन म्हणाला, “पाहा, ज्याचा शोध तुम्ही करत आहात तो मी आहे; तुम्ही कोणत्या कारणामुळे येथे आलात?” ते म्हणाले, “कर्नेल्य शताधिपती हा नीतिमान मनुष्य असून देवाचे भय बाळगणारा आहे आणि सर्व यहूदी लोक त्याच्याविषयी चांगली साक्ष देतात. त्याला पवित्र देवदूताने सुचवले आहे की, आपणाला घरी बोलावून आपणाकडून संदेश ऐकावा.” मग त्याने त्यांना आत बोलावून त्यांचा पाहुणचार केला. दुसर्‍या दिवशी पेत्र त्यांच्याबरोबर निघाला आणि यापोतील बंधुजनांपैकी कित्येक त्याच्याबरोबर गेले.

प्रेषितांची कृत्ये 10:1-23 साठी चलचित्र