राजा आपल्या मंदिरात राहू लागला, आणि परमेश्वराने त्याला त्याच्या चोहोकडल्या शत्रूंपासून विसावा दिला, तेव्हा राजा नाथान संदेष्ट्याला म्हणाला, “पाहा, मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे, पण देवाचा कोश कनाथीच्या आत राहत आहे!” नाथान राजाला म्हणाला, “तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.” त्याच रात्री परमेश्वराचे वचन नाथानाला प्राप्त झाले ते असे : “जा, माझा सेवक दावीद ह्याला सांग, परमेश्वर म्हणतो, तू माझ्या निवासासाठी मंदिर बांधणार काय? मी इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर काढले त्या दिवसापासून आजपर्यंत माझा निवास कधी मंदिरात झाला नाही; डेर्यातून व मंडपातून मी भ्रमण करीत आहे. मी इस्राएल लोकांसह जिकडे जिकडे भ्रमण करीत फिरलो तिकडे तिकडे ज्या कोणा इस्राएल वंशाला इस्राएल लोकांची जोपासना करण्याविषयी मी आज्ञा करीत असे, त्यांना तुम्ही माझ्यासाठी गंधसरूचे मंदिर का बांधले नाही असा एक शब्द तरी मी कधी बोललो आहे काय? तर आता माझा सेवक दावीद ह्याला सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या प्रजेचा, इस्राएलांचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढराच्या मागे फिरत असताना आणले, जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो, आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तुझ्यापुढून उच्छेद केला; पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावांप्रमाणे तुझे नाव मी थोर करीन. मी आपल्या इस्राएल लोकांसाठी एक स्थान नेमून देईन; मी तेथे त्यांना रुजवीन म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करून राहतील व ते तेथून पुढे कधी ढळणार नाहीत. इस्राएल लोकांवर मी शास्ते नेमले होते त्यांच्या काळापासून जसे दुर्जन त्यांना त्रस्त करीत होते तसे ते ह्यापुढे करणार नाहीत; तुला मी शत्रूंपासून विसावा दिला आहे. परमेश्वर तुला म्हणत आहे की मी तुझे घराणे कायमचे स्थापीन. तुझे दिवस पुरे झाले आणि तू जाऊन आपल्या पितरांबरोबर निजलास म्हणजे तुझ्या पोटच्या वंशजाला तुझ्यामागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करीन. तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील, मी त्याचे राजासन कायमचे स्थापीन. मी त्याचा पिता होईन व तो माझा पुत्र होईल; त्याने अधर्म केल्यास, मनुष्य जशी दंडाने व मानवपुत्र जशी फटक्यांनी शिक्षा करतात तशी मी त्याला शिक्षा करीन; पण तुझ्यापुढून घालवून दिलेल्या शौलावरची कृपादृष्टी मी दूर केली तशी त्याच्यावरची माझी कृपादृष्टी दूर होणार नाही. तुझे घराणे व तुझे राज्य ही तुझ्यापुढे अढळ राहतील; तुझी गादी कायमची स्थापित होईल.” ही सर्व वचने व दर्शने जशीच्या तशी नाथानाने दाविदाला कळवली.
२ शमुवेल 7 वाचा
ऐका २ शमुवेल 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ शमुवेल 7:1-17
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ