२ शमुवेल 24
24
इस्राएल आणि यहूदा राष्ट्रांतील लोकांची दावीद शिरगणती करतो
(१ इति. 21:1-27)
1परमेश्वराचा कोप इस्राएलावर पुनरपि झाला, आणि इस्राएल व यहूदा ह्यांची गणती करण्याची प्रेरणा देवाने त्यांच्याविरुद्ध दाविदाला केली.
2त्या वेळी राजाबरोबर सेनापती यवाब होता; त्याला राजाने सांगितले की, “दानापासून बैर-शेब्यापर्यंतच्या सर्व इस्राएल वंशांमध्ये फिरून तुम्ही लोकांची मोजदाद करा म्हणजे त्यांची संख्या मला कळेल.”
3यवाब राजाला म्हणाला, “आपले लोक कितीही असोत, आपला देव परमेश्वर त्यांना शतगुणित करो आणि माझे स्वामीराजे आपल्या डोळ्यांनी ते पाहोत; पण माझ्या स्वामीराजांना ही हौस का वाटावी?”
4तथापि राजाच्या म्हणण्यापुढे यवाब व सैन्याचे सरदार ह्यांचे काही चालेना, आणि यवाब व सैन्यांचे सरदार राजापुढून इस्राएल लोकांची मोजदाद करण्यासाठी निघून गेले.
5त्यांनी यार्देनेपलीकडे जाऊन गादातील खोर्याच्या मध्यभागी असलेल्या अरोएर नगराच्या दक्षिणेस डेरे दिले; तेथून ते याजेराकडे गेले.
6मग ते गिलाद व तहतीम होदशी ह्या प्रदेशांत गेले; पुढे दान्यान येथे गेले; तेथून वळसा घेऊन ते सीदोनास गेले.
7नंतर ते सोर नावाचा दुर्ग आणि हिव्वी व कनानी ह्यांची सर्व नगरे येथे गेले; तेथून यहूदा देशाच्या दक्षिण दिशेस बैर-शेबा येथवर गेले.
8ते देशभर चहूकडे फिरून नऊ महिने वीस दिवसांच्या अंती यरुशलेमेस आले.
9तेव्हा यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजाला दिली : धारकरी योद्धे इस्राएलात आठ लक्ष व यहूदात पाच लक्ष भरले.
10प्रजेची मोजदाद केल्यावर दाविदाचे मन त्याला खाऊ लागले. दावीद परमेश्वराला म्हणाला, “हे जे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे; तर हे परमेश्वरा, आपल्या सेवकाला दोषमुक्त कर, कारण मी मोठा मूर्खपणा केला आहे.”
11दावीद पहाटेस उठला तेव्हा त्याचा द्रष्टा जो गाद नावाचा संदेष्टा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की,
12“जा, दाविदाला सांग, परमेश्वर म्हणतो, मी तुझ्यापुढे तीन गोष्टी ठेवतो, त्यांपैकी कोणती तुझ्यासाठी करू ती सांग.”
13तेव्हा गादाने दाविदाकडे जाऊन त्याला हे सांगितले; त्याने त्याला विचारले, “तुझ्या देशात सात वर्षे दुष्काळ पडावा, किंवा तीन महिने तुझे शत्रू तुझा पाठलाग करीत असताना तू त्यांच्यापुढे पळत राहावे, किंवा तुझ्या देशात तीन दिवस मरी यावी? ह्याचा चांगला विचार कर; ज्याने मला पाठवले त्याला मी काय उत्तर देऊ ते पाहा.”
14दावीद गादास म्हणाला, “मी मोठ्या पेचात पडलो आहे; परमेश्वराच्या हाती आपण पडू या, कारण त्याचे वात्सल्य मोठे आहे; मनुष्याच्या हातात मी पडू नये.”
15मग परमेश्वराने इस्राएलात सकाळपासून नेमलेल्या मुदतीपर्यंत मरी पाठवली; आणि दानापासून बैर-शेब्यापर्यंतच्या लोकांपैकी सत्तर हजार लोक मेले.
16पण देवदूताने यरुशलेमेचा नाश करण्यासाठी त्यावर आपला हात उगारला तेव्हा परमेश्वराला त्या अरिष्टाविषयी वाईट वाटले, व त्याने लोकांचा नाश करणार्या देवदूतास म्हटले, “आता पुरे कर, आपला हात आटोप.” त्या वेळी परमेश्वराचा दूत अरवना यबूसी ह्याच्या खळ्यानजीक होता.
17लोकांचा नाश करणारा देवदूत दाविदाच्या दृष्टीस पडला तेव्हा त्याने परमेश्वराला म्हटले, “पाहा, मी पाप केले, मी दुर्मार्गानेही चाललो, पण ह्या मेंढरांनी काय केले? तुझा हात माझ्यावर व माझ्या पितृकुळावर पडावा.”
18त्या दिवशी गाद दाविदाकडे येऊन त्याला म्हणाला, “वरती जाऊन अरवना यबूसी ह्याच्या खळ्यात परमेश्वरा-प्रीत्यर्थ एक वेदी बांध.”
19तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे गादाने सांगितले ते मान्य करून दावीद वरती गेला.
20तेव्हा अरवना खाली नजर करून पाहतो तर दावीद आपल्या सेवकांसह आपल्याकडे येत आहे असे त्याच्या दृष्टीस पडले, आणि त्याने बाहेर येऊन राजापुढे भूमीपर्यंत लवून प्रणाम केला.
21अरवना म्हणाला, “माझ्या स्वामीराजांचे आपल्या दासाकडे येणे का झाले आहे?” दावीद म्हणाला, “तुझ्यापासून हे खळे विकत घेण्यासाठी मी आलो आहे; लोकांवरली ही मरी दूर व्हावी म्हणून येथे परमेश्वराप्रीत्यर्थ मला एक वेदी बांधायची आहे.”
22अरवना दाविदाला म्हणाला, “माझ्या स्वामीराजांना जे काही वाटेल ते घेऊन त्यांनी अर्पण करावे; पाहा, होमबलीसाठी हे बैल आहेत आणि इंधनासाठी मळणीची औते व बैलांचे सामान आहे.
23महाराज, अरवना हे सर्व महाराजांना देत आहे.” अरवना राजाला म्हणाला, “आपला देव परमेश्वर आपल्याला प्रसन्न होवो.”
24राजा अरवानाला म्हणाला, “नाही नाही, ह्या वस्तू तुझ्यापासून मी दाम देऊनच घेईन; मी आपला देव परमेश्वर ह्याला फुकटचे होमबली अर्पण करणार नाही.” मग दाविदाने पन्नास शेकेल चांदी देऊन ते खळे व बैल विकत घेतले.
25दाविदाने तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधून होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली. ह्या प्रकारे देशासाठी विनवणी केली ती परमेश्वराने मान्य केली आणि इस्राएल लोकांचे त्या मरीपासून निवारण झाले.
सध्या निवडलेले:
२ शमुवेल 24: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.