YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 23:8-17

२ शमुवेल 23:8-17 MARVBSI

दाविदाच्या पदरी असलेल्या शूर वीरांची नावे ही : तखमोनचा योशेब-बश्शेबेथ, हा सरदारांचा नायक होता; हाच असनी आदीनो; ह्याने भाला चालवून एका प्रसंगी आठशे माणसे मारली. त्याच्या खालोखाल एलाजार बिन दोदय बिन अहोही हा होता; दाविदाबरोबरच्या तिघा महावीरांपैकी हा एक होता, युद्धासाठी जमा झालेल्या पलिष्ट्यांना तुच्छ लेखून इस्राएल लोक त्यांच्यावर चालून गेले; तेव्हा आपला हात थकून तलवारीस चिकटेपर्यंत एलाजार पलिष्ट्यांना मार देत राहिला. त्या दिवशी परमेश्वराने मोठा विजय घडवून आणला, त्याच्यामागून लोक गेले ते केवळ लुटालूट करायला. त्याच्या खालोखाल आगे हरारी ह्याचा पुत्र शम्मा हा होता. पलिष्ट्यांनी एकत्र होऊन मसुरीच्या एका शेतात सैन्यव्यूह रचला तेव्हा लोक पलिष्ट्यांसमोरून पळून गेले. त्या शेताच्या मध्यभागी उभे राहून शम्माने शेताचे रक्षण केले व त्या पलिष्ट्यांचा वध केला; त्या प्रसंगी परमेश्वराने मोठा विजय घडवून आणला. तीस मुख्य सरदारांतले तिघे जण हंगामाच्या वेळी अदुल्लामाच्या गुहेत दाविदाकडे आले; तेव्हा पलिष्ट्यांचे सैन्य रेफाईम खोर्‍यात तळ देऊन होते. त्या वेळी दावीद गडावर असून बेथलेहेमात पलिष्ट्यांचे ठाणे बसले होते. दाविदाला उत्कट इच्छा होऊन तो म्हणाला, “बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी मला कोणी पाजील तर बरे.” त्या तिघा वीरांनी पलिष्ट्यांच्या छावणीत घुसून बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी काढून दाविदाकडे आणले; पण तो ते पिईना. त्याने ते परमेश्वराच्या नावाने ओतले. तो म्हणाला, “हे परमेश्वरा, असे कृत्य माझ्याकडून न घडो; जे आपल्या प्राणांवर उदार झाले त्यांचे हे रक्त मी प्यावे काय?” ह्यास्तव तो ते पिईना; त्या तीन वीरांनी हे कृत्य केले.