YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 22:2-16

२ शमुवेल 22:2-16 MARVBSI

तो म्हणाला, “परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड मला सोडवणारा, माझाच होय. माझा देव जो माझा दुर्ग, त्याचा आश्रय मी करतो; तो माझे कवच, माझे तारणशृंग, माझा उंच बुरूज, माझे शरणस्थान आहे; माझ्या उद्धारकर्त्या, घातापासून तू मला वाचवतोस. स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो. मृत्युतरंगांनी मला वेष्टिले अधर्माच्या पुरांनी मला घाबरे केले. अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरले, मृत्युपाश माझ्यावर आले. मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली; त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली. तेव्हा पृथ्वी हालली व कापली, आकाशाचे पाये डळमळले, त्यांना झोके बसले, कारण तो संतप्त झाला होता. त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता, त्याच्या मुखातून अग्नी निघून ग्रासत चालला होता. त्यामुळे निखारे धगधगत होते. तो आकाश लववून खाली उतरला; त्याच्या पायांखाली निबिड अंधकार होता. तो करूबारुढ होऊन उडाला, वायूच्या पंखांवर तो दृष्टीस पडला. त्याने आपल्याभोवती जलसंचय, आणि अंतराळातील अति घन मेघ ह्यांच्या अंधकाराचे मंडप आपल्यासभोवार केले. त्याच्यापुढील तेजातून निखारे धगधगत होते. परमेश्वराने आकाशातून गर्जना केली, परात्पराची वाणी झाली. त्याने बाण सोडून त्यांची दाणादाण केली; विजा पाडून त्यांची त्रेधा उडवली. तेव्हा परमेश्वराच्या धमकीने, त्याच्या नाकपुड्यांतील श्वासाच्या सोसाट्याने सागराचे तळ दिसू लागले, पृथ्वीचे पाये उघडे पडले.