YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 21

21
गिबोनी लोकांनी उगवलेला सूड
1दाविदाच्या कारकिर्दीत लागोपाठ तीन वर्षे दुष्काळ पडला; तेव्हा दाविदाने परमेश्वरासमोर जाऊन प्रश्‍न केला. परमेश्वराने उत्तर दिले, “शौल व त्याचे खुनी घराणे ह्यांच्यामुळे हा दुष्काळ पडला आहे, कारण त्याने गिबोनी लोकांचा संहार केला.”
2राजाने गिबोनी लोकांना बोलावून त्यांच्याशी बोलणे केले. (हे गिबोनी लोक इस्राएल लोकांपैकी नसून अवशिष्ट अमोर्‍यांपैकी होते; इस्राएल लोकांनी त्यांच्याशी शपथ वाहून करार केला होता; पण इस्राएल लोक व यहूदी लोक ह्यांच्या अभिमानास्तव शौलाने गिबोनी लोकांचा संहार करण्याचा प्रयत्न केला होता.) 3दाविदाने गिबोनी लोकांना विचारले, “तुमच्यासाठी मी काय करू? असे कोणत्या प्रकारचे प्रायश्‍चित्त मी करू की जेणेकडून तुम्ही परमेश्वराच्या वतनाचे अभीष्ट चिंताल?”
4गिबोनी लोक त्याला म्हणाले, “शौल व त्याचे घराणे ह्यांच्याशी आमचा सोन्यारुप्यासंबंधी काही देणेघेणे नाही; तसेच इस्राएलातील कोणा पुरुषाला जिवे मारायचे आम्हांला कारण नाही.” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही सांगाल ते मी तुमच्यासाठी करीन.”
5ते राजाला म्हणाले, “ज्या पुरुषाने आमचा नाश केला आणि आमचा निःपात व्हावा आणि इस्राएल देशात आमचे कोणी उरू देऊ नये असे योजले होते, 6त्याच्या वंशातले सात जण आमच्या हाती द्या, म्हणजे परमेश्वराने निवडलेल्या शौलाच्या गिब्यात परमेश्वराप्रीत्यर्थ आम्ही त्यांना फाशी देतो.” तेव्हा राजा म्हणाला, “मी त्यांना देईन.”
7दावीद व शौलाचा पुत्र योनाथान ह्यांची परमेश्वराच्या नावाने आणभाक झाली होती म्हणून शौलाचा नातू योनाथानाचा पुत्र मफीबोशेथ ह्याची राजाने गय केली.
8पण अय्याची कन्या रिस्पा हिला शौलापासून अरमोनी व मफीबोशेथ असे दोन पुत्र झाले होते ते आणि शौलाची कन्या मीखल हिला महोलाथी येथील बर्जिल्लय ह्याचा पुत्र अद्रीएल ह्याच्यापासून पाच पुत्र झाले होते त्यांना राजाने पकडले, 9आणि गिबोनी लोकांच्या हवाली केले; त्यांनी त्यांना डोंगरावर परमेश्वरासमोर फाशी दिले. त्या सातांचा एकदम निःपात झाला. त्यांना ठार मारण्यात आले ते दिवस हंगामाचे होते, ते जवाच्या हंगामाचे पहिले दिवस होते.
10मग अय्याची कन्या रिस्पा ही हंगामाच्या सुरुवातीपासून आकाशातून त्या शवांवर पर्जन्यवृष्टी होईपर्यंत त्या खडकावर गोणपाट पसरून बसली; दिवसा आकाशातले पक्षी व रात्री वनपशू ह्यांना तिने त्या शवांना शिवू दिले नाही.
11अय्याची कन्या व शौलाची उपपत्नी जी रिस्पा हिने जे केले ते कोणी दाविदाच्या कानावर घातले.
12तेव्हा दाविदाने जाऊन शौल व त्याचा पुत्र योनाथान ह्यांच्या अस्थी याबेश-गिलाद येथील लोकांकडून आणल्या. पलिष्टी लोकांनी गिलबोवाच्या डोंगरावर शौलाचा वध केला तेव्हा त्यांनी बेथ-शानच्या चव्हाट्यावर त्यांना टांगले होते, तेथून त्यांची शवे त्या लोकांनी चोरून आणली होती.
13त्याने तेथून शौल व त्याचा पुत्र योनाथान ह्यांच्या अस्थी आणल्या, तसेच ज्यांना फाशी दिले होते त्यांच्याही अस्थी लोकांनी जमा केल्या.
14शौल व त्याचा पुत्र योनाथान ह्यांच्या अस्थी बन्यामीन प्रदेशातील सेला येथे शौलाचा बाप कीश ह्याच्या थडग्यात पुरल्या; दाविदाच्या आज्ञेप्रमाणे लोकांनी सर्वकाही केले, त्यानंतर देशासाठी केलेली प्रार्थना देवाने ऐकली.
एका राक्षसी पुरुषापासून अबीशय ह्याने दाविदाचा बचाव केला
15पलिष्ट्यांनी इस्राएल लोकांशी पुन्हा युद्ध केले; तेव्हा दावीद आपले सैनिक बरोबर घेऊन पलिष्ट्यांशी लढला; त्या प्रसंगी दावीद थकून गेला.
16तेव्हा रेफाई वंशातला इशबी-बनोब म्हणून एक इसम होता, त्याच्या भाल्याचे वजन तीनशे शेकेल पितळ भरले; त्याने नवी तलवार कंबरेला बांधली होती; त्याने दाविदाला मारायचा बेत केला;
17पण सरूवेचा पुत्र अबीशय ह्याने दाविदाचा बचाव केला; त्या पलिष्ट्याला त्याने ठार मारले. मग दाविदाच्या लोकांनी त्याला शपथ घालून सांगितले, “पुन्हा आपण आमच्याबरोबर लढाईला येऊ नका; इस्राएलाचा दीप आपण मालवू नये.”
दाविदाच्या योद्ध्यांनी ठार केलेले धिप्पाड पुरुष
(१ इति. 20:4-8)
18ह्यानंतर पलिष्ट्यांशी गोब येथे पुन्हा युद्ध झाले, त्या वेळी हूशाथी सिब्बखय ह्याने रेफाई वंशातला सफ ह्याला जिवे मारले.
19गोब येथे पलिष्ट्यांशी पुन्हा युद्ध झाले तेव्हा बेथलेहेम येथला यारेओरगीम ह्याचा पुत्र एलहानान ह्याने गथाचा गल्याथ ह्याचा1 वध केला; त्याच्या भाल्याची काठी साळ्याच्या तुरीएवढी होती.
20गथ येथे पुन्हा युद्ध झाले तेव्हा तेथे रेफाई वंशातला एक मोठा धिप्पाड पुरुष होता, त्याच्या प्रत्येक हाताला व पायाला सहासहा अशी एकंदर चोवीस बोटे होती.
21त्याने इस्राएलाची अवहेलना केल्यावरून दाविदाचा भाऊ शिमी ह्याचा पुत्र योनाथान ह्याने त्याचा वध केला.
22हे चार पुरुष गथ येथे रेफाईला झाले होते; ते दाविदाच्या व त्याच्या लोकांच्या हाताने पडले.

सध्या निवडलेले:

२ शमुवेल 21: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन