अहीथोफेल अबशालोमाला म्हणाला, “मला परवानगी दे म्हणजे मी बारा हजार पुरुष निवडून घेऊन रातोरात दाविदाचा पाठलाग करतो, तो थकला-भागलेला व कमकुवत असता मी त्याच्यावर छापा घालून त्याला घाबरे करीन; त्याच्याबरोबरचे सर्व लोक पळून जातील; आणि मग मी राजालाच तेवढे मारीन; आणि मी सर्व लोकांना तुझ्याकडे परत आणीन; ज्याच्यामागे तू लागला आहेस त्याचा अंत झाला म्हणजे सर्व लोक तुझ्याकडे फिरलेच म्हणायचे; ह्या प्रकारे सर्व लोक स्वस्थचित्त होतील.” ही गोष्ट अबशालोमाला व इस्राएलाच्या सर्व वडील जनांना पसंत पडली. मग अबशालोम म्हणाला, “हूशय अर्की ह्यालाही बोलावून आणा; त्याचे काय म्हणणे आहे तेही पाहू.” हूशय आला तेव्हा अबशालोम त्याला म्हणाला, “अहिथोफेल अमुक अमुक मसलत देत आहे; त्याच्या सांगण्याप्रमाणे करावे काय? नाहीतर तू तरी काही मसलत सांग.” हूशय अबशालोमाला म्हणाला, “अहीथोफेलाने ह्या प्रसंगी तुला जी मसलत दिली आहे ती बरोबर नाही.” हूशय आणखी म्हणाला, “तू आपल्या बापाला व त्याच्याबरोबरच्या पुरुषांना चांगला ओळखतोस; ते वीर पुरुष आहेत. रानात एखाद्या अस्वलीची पोरे कोणी नेली असताना जशी ती चवताळते तसे ते चवताळलेले आहेत. तुझा बाप मोठा योद्धा आहे; तो काही आपल्या लोकांबरोबर रात्रीचा राहायचा नाही. पाहा, तो एखाद्या भुयारात किंवा दुसर्या ठिकाणी लपून राहिला असेल. सुरुवातीला काही लोक पडले तर अबशालोमाच्या पक्षाच्या लोकांचाच वध होत आहे अशी वार्ता लोकांमध्ये पसरेल. म्हणजे जो धैर्यवान आहे, ज्याचे हृदय सिंहासारखे आहे, अशा पुरुषाचीही गाळण उडेल; कारण सर्व इस्राएल लोकांना ठाऊक आहे की तुझा बाप लढवय्या असून त्याच्याबरोबरचे लोकही वीर आहेत. माझी तुला अशी मसलत आहे की, दानापासून बैरशेब्यापर्यंतचे अवघे इस्राएल लोक, समुद्रकिनार्यावरील रेतीप्रमाणे अगणित असे एकत्र कर आणि तू स्वतः युद्ध करायला जा. मग तो असेल तेथे त्याच्यावर आपण एकदम छापा घालू आणि जमिनीवर दंव पडते त्याप्रमाणे आपण त्याच्यावर जाऊन पडू म्हणजे त्याचा व त्याच्याबरोबरच्या लोकांचा आपण मागमूस राहू देणार नाही. तो जर एखाद्या नगरात गेला असला तर सर्व इस्राएल लोक त्या नगरास दोर लावून ते नदीत ओढून टाकतील; तेथे एक खडाही राहणार नाही.” अबशालोम व सर्व इस्राएल लोक म्हणाले, “अहीथोफेल ह्याच्या मसलतीपेक्षा हूशय अर्की ह्याची मसलत बरी दिसते.” अहीथोफेलाची चांगली मसलत मोडून अबशालोमावर अरिष्ट आणावे म्हणून परमेश्वराने ही योजना केली होती. मग हूशयाने सादोक व अब्याथार याजक ह्यांना सांगितले की, “अहीथोफेलाने अबशालोमाला व इस्राएलाच्या वडील जनांना अशी मसलत दिली होती, पण मी अशी मसलत दिली. तर लवकर जासूद पाठवून दाविदाला सांग की, आज रात्री रानातील नदीच्या उताराजवळ राहू नका; कसेही करून पार उतरून जा, नाहीतर राजा व त्याच्याबरोबरचे सर्व लोक नष्ट होतील.” योनाथान व अहीमास हे एन-रोगेल येथे राहत होते; ते शहरात आहेत हे कोणास कळू नये म्हणून एक दासी जाऊन त्यांना खबर देत असे; त्यांनी जाऊन दावीद राजाला हे वर्तमान सांगितले.
२ शमुवेल 17 वाचा
ऐका २ शमुवेल 17
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ शमुवेल 17:1-17
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ