YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 17

17
अहिथोफेलाने दिलेली मसलत हूशय हाणून पाडतो
1अहीथोफेल अबशालोमाला म्हणाला, “मला परवानगी दे म्हणजे मी बारा हजार पुरुष निवडून घेऊन रातोरात दाविदाचा पाठलाग करतो, 2तो थकला-भागलेला व कमकुवत असता मी त्याच्यावर छापा घालून त्याला घाबरे करीन; त्याच्याबरोबरचे सर्व लोक पळून जातील; आणि मग मी राजालाच तेवढे मारीन;
3आणि मी सर्व लोकांना तुझ्याकडे परत आणीन; ज्याच्यामागे तू लागला आहेस त्याचा अंत झाला म्हणजे सर्व लोक तुझ्याकडे फिरलेच म्हणायचे; ह्या प्रकारे सर्व लोक स्वस्थचित्त होतील.”
4ही गोष्ट अबशालोमाला व इस्राएलाच्या सर्व वडील जनांना पसंत पडली.
5मग अबशालोम म्हणाला, “हूशय अर्की ह्यालाही बोलावून आणा; त्याचे काय म्हणणे आहे तेही पाहू.”
6हूशय आला तेव्हा अबशालोम त्याला म्हणाला, “अहिथोफेल अमुक अमुक मसलत देत आहे; त्याच्या सांगण्याप्रमाणे करावे काय? नाहीतर तू तरी काही मसलत सांग.”
7हूशय अबशालोमाला म्हणाला, “अहीथोफेलाने ह्या प्रसंगी तुला जी मसलत दिली आहे ती बरोबर नाही.”
8हूशय आणखी म्हणाला, “तू आपल्या बापाला व त्याच्याबरोबरच्या पुरुषांना चांगला ओळखतोस; ते वीर पुरुष आहेत. रानात एखाद्या अस्वलीची पोरे कोणी नेली असताना जशी ती चवताळते तसे ते चवताळलेले आहेत. तुझा बाप मोठा योद्धा आहे; तो काही आपल्या लोकांबरोबर रात्रीचा राहायचा नाही.
9पाहा, तो एखाद्या भुयारात किंवा दुसर्‍या ठिकाणी लपून राहिला असेल. सुरुवातीला काही लोक पडले तर अबशालोमाच्या पक्षाच्या लोकांचाच वध होत आहे अशी वार्ता लोकांमध्ये पसरेल.
10म्हणजे जो धैर्यवान आहे, ज्याचे हृदय सिंहासारखे आहे, अशा पुरुषाचीही गाळण उडेल; कारण सर्व इस्राएल लोकांना ठाऊक आहे की तुझा बाप लढवय्या असून त्याच्याबरोबरचे लोकही वीर आहेत.
11माझी तुला अशी मसलत आहे की, दानापासून बैरशेब्यापर्यंतचे अवघे इस्राएल लोक, समुद्रकिनार्‍यावरील रेतीप्रमाणे अगणित असे एकत्र कर आणि तू स्वतः युद्ध करायला जा.
12मग तो असेल तेथे त्याच्यावर आपण एकदम छापा घालू आणि जमिनीवर दंव पडते त्याप्रमाणे आपण त्याच्यावर जाऊन पडू म्हणजे त्याचा व त्याच्याबरोबरच्या लोकांचा आपण मागमूस राहू देणार नाही.
13तो जर एखाद्या नगरात गेला असला तर सर्व इस्राएल लोक त्या नगरास दोर लावून ते नदीत ओढून टाकतील; तेथे एक खडाही राहणार नाही.”
14अबशालोम व सर्व इस्राएल लोक म्हणाले, “अहीथोफेल ह्याच्या मसलतीपेक्षा हूशय अर्की ह्याची मसलत बरी दिसते.” अहीथोफेलाची चांगली मसलत मोडून अबशालोमावर अरिष्ट आणावे म्हणून परमेश्वराने ही योजना केली होती.
15मग हूशयाने सादोक व अब्याथार याजक ह्यांना सांगितले की, “अहीथोफेलाने अबशालोमाला व इस्राएलाच्या वडील जनांना अशी मसलत दिली होती, पण मी अशी मसलत दिली.
16तर लवकर जासूद पाठवून दाविदाला सांग की, आज रात्री रानातील नदीच्या उताराजवळ राहू नका; कसेही करून पार उतरून जा, नाहीतर राजा व त्याच्याबरोबरचे सर्व लोक नष्ट होतील.”
17योनाथान व अहीमास हे एन-रोगेल येथे राहत होते; ते शहरात आहेत हे कोणास कळू नये म्हणून एक दासी जाऊन त्यांना खबर देत असे; त्यांनी जाऊन दावीद राजाला हे वर्तमान सांगितले.
18पण एका पोराने त्यांना पाहून अबशालोमाला जाऊन सांगितले; तेव्हा ते त्वरेने निघून बहूरीमातील एका मनुष्याच्या घरी गेले; त्याच्या चौकात एक विहीर होती तिच्यात ते उतरले.
19तेव्हा एका स्त्रीने एक चादर घेऊन विहिरीच्या तोंडावर पसरली व तिच्यावर काही भरडलेले धान्य पसरले, त्यामुळे कोणाच्या काही लक्षात आले नाही.
20अबशालोमाचे चाकर त्या घरी त्या बाईकडे आले; ते तिला म्हणाले, “अहीमास व योनाथान कोठे आहेत?” तेव्हा त्या स्त्रीने त्यांना म्हटले, “ते ओहळाच्या पलीकडे गेले आहेत.” त्यांनी पुष्कळ शोध केला, पण ते सापडले नाहीत, म्हणून ते परत यरुशलेमेला गेले.
21ते निघून गेल्यावर ते पुरुष विहिरीतून बाहेर निघाले; त्यांनी जाऊन दावीद राजाला खबर दिली, आणि ते दाविदाला म्हणाले, “उठा, नदीचा पार उतरून लवकर पलीकडे जा; अहीथोफेलाची तुमच्याविरुद्ध अमुक अमुक मसलत आहे.”
22तेव्हा दावीद व त्याच्याबरोबरचे सर्व लोक यार्देनेपार गेले. सकाळी उजाडले तेव्हा यार्देनेच्या पलीकडे गेला नाही असा कोणीच मागे राहिला नाही.
23आपल्या मसलतीप्रमाणे काम झाले नाही हे अहीथोफेलाने पाहिले तेव्हा तो आपल्या गाढवावर खोगीर घालून आपल्या नगरास आपल्या घरी गेला, आणि आपल्या घराची सर्व व्यवस्था लावून त्याने गळफास घेतला; तो मृत्यू पावला, व त्याला त्याच्या बापाच्या थडग्यात पुरले.
महनाईम येथे दावीद
24मग दावीद महनाइमाला गेला. इकडे अबशालोम इस्राएल लोकांसह यार्देनेपार गेला.
25अबशालोमाने यवाबाच्या जागी अमासा ह्याला सेनापती नेमले. यवाबाची आई सरूवा हिची नाहाश म्हणून एक बहीण होती; हिच्या अबीगल नावाच्या कन्येपाशी इथ्रा नावाचा एक इस्राएली पुरुष गेला होता, त्याचा पुत्र हा अमासा होय.
26इस्राएल लोकांनी व अबशालोमाने गिलाद देशात तळ दिला.
27दावीद महनाईम येथे आला तेव्हा अम्मोन्यांच्या राब्बातला नाहाशाचा पुत्र शोबी व लो-दबारातील अम्मीएलाचा पुत्र माखीर आणि रोगलीम येथील बर्जिल्लय गिलादी ह्यांनी
28दाविदासाठी व त्याच्याबरोबरच्या माणसांसाठी खाटा, भांडीकुंडी, गहू, जव, हुरडा, शेंगा, वाटाणे, फुटाणे,
29मध, लोणी, मेंढरे व गाईच्या दुधाचा खवा आणला; हे लोक रानात असून भुकेले, तान्हेले व थकलेले असतील असे त्यांना वाटले.

सध्या निवडलेले:

२ शमुवेल 17: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन