YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 11:1-17

२ शमुवेल 11:1-17 MARVBSI

राजे लोक युद्धांच्या मोहिमेस जातात त्या वेळी म्हणजे वर्षारंभी दाविदाने यवाबाला व त्याच्याबरोबर त्याच्या नोकरचाकरांना व सर्व इस्राएल लोकांना पाठवले; त्यांनी अम्मोन्यांचा संहार करून राब्बा नगरास वेढा घातला; पण दावीद यरुशलेमेतच राहिला. संध्याकाळच्या वेळी दावीद पलंगावरून उठून राज-मंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला; तेव्हा एक स्त्री स्नान करताना त्याने तेथून पाहिली; ती स्त्री दिसायला फार सुंदर होती. मग दाविदाने चाकर पाठवून त्या स्त्रीविषयी विचारपूस केली; तेव्हा कोणी म्हटले, “ती अलीयामाची कन्या व उरीया हित्ती ह्याची बायको बथशेबा आहे ना?” तेव्हा दाविदाने जासूद पाठवून तिला बोलावून आणले, ती दाविदाकडे आली आणि दाविदाने तिच्याशी समागम केला; (ती आपल्या अशुद्धतेपासून शुद्ध झाली होती.) मग ती आपल्या घरी गेली. त्या स्त्रीला गर्भ राहिला; तेव्हा तिने दाविदाला निरोप पाठवून सांगितले, ‘मी गरोदर आहे.’ दाविदाने यवाबाला निरोप पाठवला की, “उरीया हित्ती ह्याला माझ्याकडे पाठवून द्या.” तेव्हा यवाबाने त्याला दाविदाकडे पाठवले. उरीया दाविदाकडे आला तेव्हा त्याने त्याला यवाब व त्याचे लोक कसे काय आहेत आणि युद्ध कसे चालले आहे हे विचारले. मग दावीद उरीयाला म्हणाला, “आपल्या घरी जा व हातपाय धू,” उरीया राजमंदिरातून निघाला व त्याच्या पाठोपाठ राजाकडून त्याला काही इनाम गेले. उरीया आपल्या स्वामीच्या इतर सर्व चाकरांबरोबर राजवाड्याच्या दारीच निजून राहिला, आपल्या घरी गेला नाही. उरीया आपल्या घरी गेला नाही हे दाविदाने ऐकले तेव्हा तो त्याला म्हणाला, “तू प्रवास करून आला आहेस ना? तर तू आपल्या घरी का जात नाहीस?” उरीया दाविदाला म्हणाला, “कोश, इस्राएल व यहूदा मांडवात राहत आहेत आणि माझा धनी यवाब व माझ्या धन्याचे सेवक खुल्या मैदानात तळ देऊन आहेत; असे असताना मी घरी जाऊन खाऊपिऊ आणि आपल्या स्त्रीबरोबर निजू काय? आपल्या जीविताची शपथ, आपल्या प्राणाची शपथ, मी असले काम करणार नाही.” दावीद उरीयाला म्हणाला, “आजही येथेच राहा; उद्या मी तुला रवाना करीन.” मग उरीया त्या दिवशी व दुसर्‍या दिवशीही यरुशलेमेत राहिला. दाविदाने बोलावल्यावरून त्याने येऊन त्याच्यासमोर खाणेपिणे केले व त्याला त्याने दारू पाजून मस्त केले. संध्याकाळ झाली तेव्हा तो आपल्या स्वामीच्या सेवकांबरोबर आपल्या खाटेवर निजायला गेला, पण घरी गेला नाही. सकाळी दाविदाने यवाबाच्या नावे पत्र लिहून उरीयाच्या हाती पाठवले. त्या पत्रात असे लिहिले होते की, “तुंबळ युद्धाच्या तोंडी उरीयाला ठेवा; आणि त्याला तेथेच सोडून मागे हटा; म्हणजे त्याला मार लागून तो मरेल.” मग यवाबाने नगराची चांगली टेहळणी करून जेथे शूर योद्धे असल्याचे त्याला माहीत होते तेथे उरीयाला नेमले. मग नगरातील पुरुषांनी बाहेर पडून यवाबाशी युद्ध केले; तेव्हा दाविदाच्या सेवकांपैकी काही कामास आले आणि उरीया हित्ती हाही गतप्राण झाला.