YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 9:1-13

२ राजे 9:1-13 MARVBSI

नंतर अलीशा संदेष्ट्याने संदेष्ट्यांच्या शिष्यांपैकी एकाला बोलावून सांगितले, “कंबर बांध आणि ही तेलाची कुपी हाती घेऊन रामोथ-गिलाद येथे जा. तेथे पोहचल्यावर येहू बिन यहोशाफाट बिन निमशी ह्याला शोधून काढ; मग आत जाऊन त्याला त्याच्या भाऊबंदांतून उठवून आतल्या खोलीत घेऊन जा. मग ही तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर ओत व असे बोल, ‘परमेश्वर म्हणतो, तू इस्राएलाचा राजा व्हावेस म्हणून मी तुला अभिषेक केला आहे.’ मग दार उघडून पळ काढ, थांबू नकोस.” नंतर तो तरुण संदेष्टा रामोथ-गिलाद येथे गेला. तो तेथे जाऊन पोहचतो तर तेथे सैन्याचे सरदार बसले आहेत असे त्याला दिसून आले; तेव्हा तो म्हणाला, “हे सरदारा, तुला काही सांगायचे आहे.” येहूने विचारले, “आम्हा सर्वांतून कोणाला?” तो म्हणाला, “हे सरदारा, तुला.” तेव्हा तो उठून घरात गेल्यावर त्या शिष्याने त्याच्या मस्तकावर तेल ओतून म्हटले, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुला परमेश्वराच्या लोकांचा म्हणजे इस्राएलाचा राजा व्हावे म्हणून अभिषेक केला आहे; ईजबेलीच्या हातून माझे सेवक जे संदेष्टे आणि परमेश्वराचे दुसरे सर्व सेवक ह्यांचा रक्तपात झाला आहे त्याचा मला सूड घेणे आहे, म्हणून आपला धनी अहाब ह्याच्या घराण्याचा तू संहार कर. अहाबाच्या सर्व घराण्याचा समूळ नाश होईल; अहाबाचा प्रत्येक मुलगा, मग तो इस्राएलाच्या अटकेत असो की मोकळा असो, त्याचा मी उच्छेद करीन. नबाटाचा पुत्र यराबाम व अहीयाचा पुत्र बाशा ह्यांच्या घराण्यांसारखे मी अहाबाच्या घराण्याचे करीन. इज्रेलाच्या भूमीवर ईजबेलीस कुत्री खातील; तिला पुरायला कोणी असणार नाही.” मग दार उघडून त्याने पळ काढला. येहू बाहेर आपल्या धन्याच्या सेवकांकडे आला तेव्हा एकाने त्याला विचारले, “सर्वकाही ठीक आहे ना? तो वेडा तुझ्याकडे का आला होता?” तो त्यांना म्हणाला, “तो मनुष्य कोण व त्याचा संदेश काय हे तुम्हांला माहीत आहेच.” ते म्हणाले, “भलतेच; काय आहे ते आम्हांला सांग.” तो म्हणाला, “त्याने मला असे सांगितले. परमेश्वर म्हणतो तू इस्राएलाचा राजा व्हावे म्हणून मी तुला अभिषेक केला आहे.” हे ऐकून त्यांनी त्वरा करून आपापली वस्त्रे उतरवून त्याच्या पायांखाली पायर्‍यांवर पसरली आणि कर्णा वाजवून ‘येहू राजा झाला’ असा पुकारा केला.