YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 6:18-33

२ राजे 6:18-33 MARVBSI

अरामी लोक अलीशावर चालून आले तेव्हा त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली की, “ह्या लोकांना आंधळे कर.” अलीशाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने त्यांना आंधळे केले. अलीशा त्यांना म्हणाला, “हा रस्ता नव्हे तो रस्ता व हे नव्हे ते शहर; माझ्यामागून या म्हणजे ज्या मनुष्याचा तुम्ही शोध करत आहात त्याच्याकडे मी तुम्हांला घेऊन जाईन.” मग तो त्यांना शोमरोनात घेऊन गेला. ते शोमरोनात आल्यावर अलीशा म्हणाला, “परमेश्वरा, ह्या लोकांचे डोळे उघड, ह्यांना दिसू दे.” परमेश्वराने त्यांचे डोळे उघडले. त्यांना दिसू लागले तेव्हा आपण शोमरोनामध्ये आहोत असे त्यांना दिसले. त्यांना पाहून इस्राएलाचा राजा अलीशाला म्हणाला, “बाबा, मी ह्यांना मारून टाकू काय?” त्याने म्हटले, “ह्यांना मारू नकोस; तलवार व धनुष्य ह्यांनी पाडाव केलेल्यांना तू मारून टाकत असतोस काय? ह्यांच्यापुढे अन्नपाणी वाढ; ह्यांना खाऊनपिऊन आपल्या धन्याकडे परत जाऊ दे.” मग त्याने त्यांना मोठी मेजवानी दिली; त्यांचे खाणेपिणे आटोपल्यावर त्याने त्यांना निरोप दिला; आणि ते आपल्या धन्याकडे गेले. अरामी लोकांच्या टोळ्या इस्राएल देशावर पुन्हा आल्या नाहीत. त्यानंतर अरामाचा राजा बेन-हदाद ह्याने आपले सर्व सैन्य एकत्र करून शोमरोनावर स्वारी करून त्याला वेढा घातला. तेव्हा शोमरोनात जबर महागाई झाली; वेढा एवढा भारी पडला की, गाढवाच्या एका मुंडक्याला ऐंशी रुपये आणि कबुतराच्या पावशेर विष्ठेला पाच रुपये पडू लागले. इस्राएलाचा राजा तटावर फिरत असताना एका स्त्रीने ओरडून त्याला म्हटले, “अहो स्वामीराज, साहाय्य करा!” तो म्हणाला, “परमेश्वर तुला साहाय्य करत नाही तर मी कोठून करू? खळ्यातून की द्राक्षकुंडातून?” राजाने तिला विचारले, “तुला काय झाले?” तिने उत्तर दिले, “ही स्त्री मला म्हणाली, ‘तुझा मुलगा दे, म्हणजे आपण आज त्याला खाऊ आणि उद्या माझ्या मुलाला खाऊ.’ माझा मुलगा शिजवून आम्ही खाल्ला; पण दुसर्‍या दिवशी मी हिला म्हटले, ‘तुझा मुलगा दे म्हणजे आपण त्याला खाऊ.’ तेव्हा हिने आपला मुलगा लपवून ठेवला.” त्या स्त्रीचे हे भाषण ऐकून राजाने आपली वस्त्रे फाडली. त्या प्रसंगी तो नगराच्या तटावर फिरत होता आणि लोकांनी पाहिले तेव्हा त्याने आतून आपल्या अंगाला गोणपाट गुंडाळले आहे असे त्यांना दिसले. तेव्हा तो म्हणाला, “शाफाटाचा पुत्र अलीशा ह्याचे शिर जर मी आज त्याच्या धडावर राहू देईन तर देव माझे असेच किंबहुना ह्याहूनही अधिक करो.” अलीशा त्या वेळी आपल्या घरात बसला असून त्याच्या भोवती वडील जन बसले होते; राजाने आपल्या जवळचा एक जासूद पाठवला; तो जाऊन पोहचण्यापूर्वी अलीशा त्या वडील जनांना म्हणाला, “पाहा, ह्या खुनी मनुष्याच्या पुत्राने माझे शिर छेदण्यास मनुष्य पाठवला आहे; तर तो जासूद आला म्हणजे कवाडे लावून घेऊन त्याला लोटून द्या; त्याच्या मागोमाग त्याच्या धन्याच्या पावलांची चाहूल ऐकू येत आहे, नाही काय?” तो त्यांच्याशी असे बोलत आहे इतक्यात जासूद त्याच्याकडे येऊन पोहचला. तो म्हणाला, “ही विपत्ती परमेश्वराने पाठवली आहे तर ह्यापुढे मी परमेश्वराची वाट का पाहावी?”