YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 6:1-17

२ राजे 6:1-17 MARVBSI

संदेष्ट्यांच्या शिष्यांनी अलीशाला म्हटले, “पाहा,आम्ही आपणासमोर राहत आहोत ते स्थळ फार अपुरे आहे. तर यार्देनेतीरी जाऊन तेथून एकेकाने एकेक तुळई आणून राहण्यासाठी एक आश्रम बांधावा म्हणून आम्हांला परवानगी द्या.” त्याने म्हटले, “बरे, जा.” एकाने त्याला म्हटले, “कृपा करून आपण आपल्या सेवकांबरोबर या.” तो म्हणाला, “बरे, येतो.” तो त्यांच्याबरोबर गेला. ते यार्देनेकडे येऊन लाकडे तोडू लागले. एक जण तुळई तोडून पाडत असता कुर्‍हाड दांड्यातून निसटून पाण्यात पडली तेव्हा तो ओरडून म्हणाला, “हायहाय! स्वामी, मी ती मागून आणली होती.” देवाच्या माणसाने विचारले, “ती कोठे पडली?” त्याने ती जागा दाखवल्यावर अलीशाने एक लाकूड तोडून तेथे टाकले तेव्हा लोखंड पाण्यावर तरंगू लागले. त्याने म्हटले, “ती काढून घे.” मग त्याने हात लांब करून ती घेतली. अलीशा व अरामी मग अरामाच्या राजाने इस्राएलाबरोबर युद्ध आरंभले; त्याने आपल्या सेवकांबरोबर अशी मसलत केली की, “अमुक अमुक ठिकाणी आपण तळ द्यावा.” तेव्हा देवाच्या माणसाने इस्राएलाच्या राजाला सांगून पाठवले : “सावध राहा; अमुक अमुक ठिकाणी जाऊ नकोस; तेथे अरामी लोक चढाई करून येत आहेत.” तेव्हा ज्या ठिकाणी जाऊ नकोस अशी सूचना इस्राएलाच्या राजाला देवाच्या माणसाने केली होती तेथे त्याने लोक पाठवले. असा आपला बचाव त्याने एकदोनदाच नव्हे तर अनेकदा केला. ह्यावरून अरामाच्या राजाचे मन संतापले; त्याने आपल्या सेवकांना बोलावून विचारले, “आपल्यातला कोण इस्राएलाच्या राजाच्या पक्षाचा आहे हे तुम्ही मला दाखवून देणार नाही काय?” त्याच्या एका सेवकाने त्याला सांगितले, “माझे स्वामीराज, असा कोणी नाही; पण आपण शयनगृहात बोलता ते शब्द इस्राएलातला संदेष्टा अलीशा हा इस्राएलाच्या राजाला कळवतो.” त्याने म्हटले, “तो कोठे आहे ते पाहा, म्हणजे मी माणूस पाठवून त्याला पकडून आणतो.” मग तो दोथान येथे आहे अशी त्याला बातमी लागली. तेव्हा त्याने घोडे व रथ बरोबर देऊन तेथे मोठे सैन्य पाठवले; त्यांनी रातोरात जाऊन नगर वेढले. सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला तेव्हा सैन्याने घोडे व रथ ह्यांसह नगराला वेढा दिला आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्याला म्हणाला, “स्वामी, हायहाय! आता आपण काय करावे?” तो म्हणाला, “भिऊ नकोस; त्यांच्या पक्षाचे आहेत त्यांच्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत.” अलीशाने प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, ह्याचे डोळे उघड, ह्याला दृष्टी दे.” परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले, तो पाहा, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ ह्यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले.