अरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धन्याच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता; कारण त्याच्या द्वारे परमेश्वराने अरामास जय दिला होता. तो पराक्रमी वीर होता, पण कोडी होता. अरामी लोकांनी टोळ्या करून छापा घातला, आणि इस्राएल देशातून एक लहान मुलगी कैद करून नेली; ती नामानाच्या स्त्रीच्या सेवेसाठी राहिली. ती आपल्या मालकिणीला म्हणाली, “शोमरोनातल्या संदेष्ट्याशी माझ्या धन्याची गाठ पडती तर किती बरे होते? त्याने त्याचे कोड बरे केले असते.” कोणीएकाने जाऊन आपल्या धन्याला सांगितले की ती इस्राएल मुलगी असे असे म्हणत आहे.” अरामाच्या राजाने म्हटले, “जा तर मग. मी इस्राएलाच्या राजाला पत्र देतो.” मग तो माणूस दहा किक्कार1 चांदी, सोन्याची सहा हजार नाणी व दहा पोशाख घेऊन निघाला. त्याने इस्राएलाच्या राजासाठी पत्र आणले; त्यात असा मजकूर होता की, “ह्या पत्राच्या द्वारे आपल्याला कळवण्यात येत आहे की नामान नावाच्या माझ्या सेवकाला मी आपल्याकडे पाठवले आहे, आपण त्याचे कोड बरे करावे.” हे पत्र वाचून इस्राएलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली; तो म्हणाला, “ह्या मनुष्याने कोड बरे करण्यासाठी माझ्याकडे हा माणूस पाठवला आहे; मरण व जीवन देणारा मी देव आहे काय? विचार करा; पाहा, हा माझ्याशी भांडण करण्याचे काहीतरी निमित्त पाहत आहे.” इस्राएलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली हे देवाचा माणूस अलीशा ह्याने ऐकले, तेव्हा त्याने राजाला सांगून पाठवले, “तू आपली वस्त्रे का फाडलीस? त्याने माझ्याकडे यावे, म्हणजे इस्राएलात संदेष्टा आहे हे त्याला कळेल.” तेव्हा नामान घोड्यांरथांनिशी अलीशाच्या दारी जाऊन उभा राहिला. अलीशाने एका जासुदाच्या हाती त्याला सांगून पाठवले की, “जाऊन यार्देनेत सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील.” हे ऐकून नामान रागावून चालता झाला; तो म्हणाला, “पाहा, मला वाटले होते तो स्वतः माझ्याकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर ह्याचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे कोड बरे करील. दिमिष्कातल्या नद्या अबाना व परपर ह्या इस्राएलाच्या सर्व जलाशयांपेक्षा उत्तम नाहीत काय? त्यांच्यात स्नान करून मला शुद्ध होता येणार नाही काय?” असे म्हणून तो क्रोधित होऊन निघून गेला. मग त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणाले, “बाबा, संदेष्ट्याने आपल्याला काही अवघड काम सांगितले असते तर आपण केले नसते काय? तर स्नान करून शुद्ध व्हा, एवढेच त्याने आपल्याला सांगितले, ते आपण का करू नये?” मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देनेत जाऊन सात वेळा बुचकळ्या मारल्या; तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला.
२ राजे 5 वाचा
ऐका २ राजे 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ राजे 5:1-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ