YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 19:1-19

२ राजे 19:1-19 MARVBSI

हे ऐकून हिज्कीयाने आपली वस्त्रे फाडली व गोणपाट नेसून तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. तेव्हा खानगी कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना व याजकांपैकी वृद्ध लोक ह्यांना गोणपाट नेसलेले असे आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा ह्याच्याकडे त्याने पाठवले. ते जाऊन त्याला म्हणाले, “हिज्कीया असे म्हणतो की आजचा दिवस क्लेश, शिक्षा व अपमान ह्यांचा आहे, कारण मुले जन्मायला आली पण प्रसवण्याची शक्ती नाही. जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी अश्शूराच्या राजाने रब-शाके ह्याच्याबरोबर जो निरोप पाठवला त्याचे शब्द आपला देव परमेश्वर कदाचित ऐकेल, व आपला देव परमेश्वर ते शब्द ऐकून त्याला शिक्षा करील, म्हणून जे काही शेष उरले आहे त्यासाठी आपण रदबदली करा.” ह्याप्रमाणे हिज्कीया राजाचे सेवक यशया ह्याच्याकडे आले. तेव्हा यशया त्यांना म्हणाला, “आपल्या धन्याला असे सांगा, परमेश्वर म्हणतो, ‘अश्शूराच्या राजाच्या सेवकांनी ज्या शब्दांनी माझा उपमर्द केला आहे ते शब्द तू ऐकले आहेत; त्यांनी तू घाबरू नकोस. पाहा, मी त्याच्या ठायी अशी काही प्रेरणा करीन की तो काही अफवा ऐकून आपल्या देशाला परत जाईल व त्याच्याच देशात तो तलवारीने पडेल असे मी करीन.”’ नंतर रब-शाके परत गेला तेव्हा अश्शूरचा राजा लिब्ना नगराशी लढताना त्याला आढळला; कारण लाखीशाहून त्याने तळ उठवला अशी त्याला खबर लागली होती. मग “कूशाचा राजा तिर्‍हाका तुझ्याशी लढायला निघाला आहे” असे कोणी बोलताना त्याने ऐकले; हे ऐकून त्याने हिज्कीयाला जासुदांच्या हाती सांगून पाठवले की, “तुम्ही हिज्कीया राजाकडे जाऊन सांगा, ज्या तुझ्या देवावर तू भिस्त ठेवतोस तो, ‘अश्शूराच्या राजाच्या हाती यरुशलेम लागणार नाही, असे बोलून तुला न फसवो. अश्शूराच्या राजांनी सर्व देशांचे काय केले ते पाहा; त्यांचा विध्वंस कसा केला हे तू ऐकले आहेच; तर तू सुटणार काय? गोजान, हारान, रेसफ व तलस्सार येथे राहणारे एदेनी लोक ह्यांचा माझ्या वाडवडिलांनी विध्वंस केला, त्यांचा त्या राष्ट्रांच्या देवांनी बचाव केला काय? हमाथाचा राजा, अर्पादाचा राजा, आणि सफरवाईम, हेना व इव्वा ह्यांचे राजे हे कोठे आहेत?”’ हिज्कीयाने जासुदांच्या हातून हे पत्र घेऊन वाचले; मग हिज्कीया परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि ते त्याने परमेश्वरापुढे उघडून ठेवले. हिज्कीयाने परमेश्वराची प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, करूबारूढ असलेल्या देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस; तूच आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. हे परमेश्वरा, कान लावून ऐक; हे परमेश्वरा, तू डोळे उघडून पाहा आणि सन्हेरिबाने तुझा म्हणजे जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी जो निरोप पाठवला आहे त्याचे शब्द ऐक. हे परमेश्वरा, खरोखर अश्शूराच्या राजांनी सर्व राष्ट्रे व त्यांच्या जमिनी ओसाड केल्या आहेत; त्यांचे देव त्यांनी अग्नीत टाकले आहेत; कारण ते देव नव्हते, ते माणसांच्या हातांनी घडलेले काष्ठ व पाषाण होते म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला. आता परमेश्वरा, आमच्या देवा, त्याच्या हातातून आम्हांला सोडव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे जाणतील की तूच काय तो परमेश्वर देव आहेस.”