YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 18:19-37

२ राजे 18:19-37 MARVBSI

तेव्हा रब-शाके त्यांना म्हणाला, “हिज्कीयाला सांगा की, राजाधिराज, अश्शूरचा राजा म्हणतो, हा तुझा भरवसा कसला! तू बोलून दाखवलेला तुझा युद्धसंकल्प व युद्धबल ह्या केवळ वायफळ गोष्टी आहेत. तू माझ्याशी फितूर झालास तो कोणाच्या बळावर? पाहा, तो मिसर म्हणजे चेचलेला बोरू, त्यावर तू टेकतोस; त्यावर कोणी टेकला तर तो त्याच्या हातात शिरून बोचेल; जे कोणी मिसरी राजा फारो ह्याच्यावर टेकतात त्यांना तो असाच आहे. तू मला म्हणशील, आम्ही आमचा देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवतो, तर ज्याची उच्च स्थाने व वेदी काढून टाकून यहूदा व यरुशलेम ह्यांना हिज्कीया म्हणाला की, ‘ह्या एका वेदीपुढे यरुशलेमेत भजन करा, तोच नव्हे का तो देव?’ आता माझा स्वामी अश्शूरचा राजा ह्याच्याशी सामना करण्यासाठी उभा राहा; तुला स्वार बसवण्याची ताकद असली तर तुला दोन हजार घोडे देतो. माझ्या धन्याच्या अगदी कनिष्ठ दर्जाच्या एका तरी सरदाराला तू कसा पिटाळशील? म्हणूनच तू रथ आणि स्वार मिळवण्यासाठी मिसरावर भिस्त ठेवतोस ना? मी ह्या देशावर चाल करून ह्याचा नाश करण्यास आलो तो का परमेश्वराच्या सांगण्यावाचून? परमेश्वरानेच मला सांगितले की ह्या देशावर चढाई करून जा व ह्याचा विध्वंस कर.” मग एल्याकीम बिन हिल्कीया, शेबना व यवाह ह्यांनी रब-शाके ह्याला विनंती केली की, “आपल्या दासांशी अरामी भाषेत बोला, ती आम्हांला समजते; कोटावरील लोकांच्या कानी पडेल म्हणून यहूदी भाषेत आमच्याशी बोलू नका.” रब-शाके ह्याने उत्तर केले की, “माझ्या धन्याने केवळ तुझ्या धन्याशी व तुझ्याशी हे बोलण्यासाठी मला पाठवले काय? जे तुमच्याबरोबर कोटावर बसले आहेत त्यांनी आपले मलमूत्र भक्षण करावे म्हणून त्यांच्याकडेही पाठवले नाही काय?” मग रब-शाके पुढे होऊन यहूदी भाषेत मोठ्याने म्हणाला, “राजाधिराज, अश्शूरचा राजा ह्याचे म्हणणे ऐका! राजा म्हणतो, ‘हिज्कीयाला तुम्हांला भुरळ घालू देऊ नका, त्याच्याने तुमचा माझ्या हातून बचाव होणार नाही. परमेश्वर आमचा बचाव करीलच करील, हे शहर अश्शूराच्या राजाच्या हाती जाणार नाही असे बोलून हिज्कीया तुम्हांला परमेश्वरावर भिस्त ठेवायला न लावो.’ हिज्कीयाचे ऐकू नका, कारण अश्शूरचा राजा म्हणतो, माझ्याशी सल्ला करा व माझ्याकडे निघून या; आणि तूर्त तुम्ही प्रत्येक जण आपापल्या द्राक्षवेलाचे फळ खा, तुम्ही प्रत्येक जण आपापल्या अंजिराचे फळ खा, तुम्ही प्रत्येक जण आपापल्या हौदांचे पाणी प्या; पुढे मी येऊन तुमच्या देशासारखा देश, धान्याचा व द्राक्षारसाचा देश, अन्नाचा व द्राक्षाच्या मळ्यांचा देश, जैतून तेलाचा व मधाचा देश ह्यात तुम्हांला नेईन; म्हणजे तुम्ही जिवंत राहाल, मरणार नाही; परमेश्वर आमचा बचाव करील असे बोलून हिज्कीया तुमचे मन वळवू पाहील तेव्हा त्याचे ऐकू नका. राष्ट्रांच्या देवांपैकी कोणी आपला देश अश्शूराच्या राजाच्या हातून सोडवला आहे? हमाथ व अर्पाद ह्यांचे देव कोठे आहेत? सफरवाईम, हेना व इव्वा ह्यांचे देव कोठे आहेत? त्यांनी शोमरोन माझ्या हातून सोडवले आहे काय? ह्या सर्व देशांच्या देवांपैकी कोणी आपला देश माझ्या हातून सोडवला? तर परमेश्वर माझ्या हातून यरुशलेम कसे सोडवणार?” लोक गप्प राहिले, त्याच्याशी एकही शब्द बोलले नाहीत; कारण “तुम्ही त्याला उत्तर देऊ नका” अशी राजाची त्यांना ताकीद होती. मग खानगी कारभारी एल्याकीम बिन हिल्कीया, चिटणीस शेबना व बखरनवीस यवाह बिन आसाफ हे आपली वस्त्रे फाडून हिज्कीयाकडे आले व त्याला त्यांनी रब-शाके ह्याचे बोलणे कळवले.