पेकह बिन रमाल्या ह्याच्या कारकिर्दीच्या सतराव्या वर्षी यहूदाचा राजा आहाज बिन योथाम राज्य करू लागला. आहाज राज्य करू लागला तेव्हा तो वीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत सोळा वर्षे राज्य केले; त्याचा पूर्वज दावीद ह्याने आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे योग्य केले होते त्याप्रमाणे त्याने केले नाही. तो इस्राएलाच्या राजांच्या मार्गाने चालला; ज्या राष्ट्रांना परमेश्वराने इस्राएल लोकांपुढून घालवले होते त्यांच्या अमंगळ आचारांना अनुसरून त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून त्याला अर्पण केले. तो उच्च स्थानी, पहाडांवर व प्रत्येक हिरव्या वृक्षाखाली यज्ञ करत असे व धूप जाळत असे. मग अरामाचा राजा रसीन आणि इस्राएलाचा राजा पेकह बिन रमाल्या हे यरुशलेमेवर चढाई करून युद्धास आले; त्यांनी आहाजाला वेढा दिला पण त्यांना त्याला जिंकता आले नाही. त्या वेळी अरामाचा राजा रसीन ह्याने एलाथ नावाचे नगर सर करून पुन्हा अरामात सामील केले व तेथल्या यहूदी लोकांना हाकून दिले; अरामी लोक तेथे जाऊन राहिले, ते आजपर्यंत तेथेच राहत आहेत. मग आहाजाने अश्शूराचा राजा तिग्लथ-पिलेसर ह्याला जासुदांच्या हाती सांगून पाठवले की, “मी आपला सेवक, आपला मुलगा आहे, तर आता अरामाचा राजा व इस्राएलाचा राजा हे माझ्यावर चढाई करून आले आहेत. आपण येऊन त्यांच्या हातून माझा बचाव करा.” परमेश्वराच्या मंदिरात व राजवाड्याच्या भांडारात जेवढे सोनेरुपे आहाजास सापडले तेवढे त्याने अश्शूराच्या राजाकडे नजराणा म्हणून पाठवले. त्याचे मागणे मान्य करून अश्शूराच्या राजाने दिमिष्कावर चढाई करून ते घेतले व तेथील लोकांना पाडाव करून कीर येथे नेले; आणि रसीन ह्याचा वध केला.
२ राजे 16 वाचा
ऐका २ राजे 16
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ राजे 16:1-9
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ