YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ करिंथ 5:1-21

२ करिंथ 5:1-21 MARVBSI

कारण आम्हांला ठाऊक आहे की, आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडून टाकण्यात आले, तर देवाने आमच्यासाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे; ते हातांनी बांधलेले गृह नसून सार्वकालिक आहे. ह्या गृहात असताना आम्ही स्वर्गीय गृहरूप वस्त्र परिधान करण्याच्या उत्कंठेने कण्हतो; आम्ही अशा प्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही. कारण जे आम्ही ह्या मंडपात आहोत ते आम्ही भाराक्रांत होऊन कण्हतो; वस्त्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर ते परिधान करावे अशी इच्छा बाळगतो; ह्यासाठी की, जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे. ज्याने आम्हांला ह्याकरताच सिद्ध केले तो देव आहे; त्याने आपला आत्मा आम्हांला विसार म्हणून दिला आहे. म्हणून आम्ही सर्वदा धैर्य धरतो; आणि हे लक्षात बाळगतो की, आम्ही शरीरात वस्ती करत आहोत तोवर आम्ही प्रभूपासून दूर आलेले असे आहोत. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी1 दिसते त्याप्रमाणे चालत नाही. आम्ही धैर्य धरतो, आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हांला अधिक बरे वाटते. म्हणून आम्ही गृहवासी असलो किंवा दूर आलेले असलो, तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हांला हौस आहे. कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खर्‍या स्वरूपाने प्रकट झाले पाहिजे, ह्यासाठी की, प्रत्येकाला, त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे; मग ते बरे असो किंवा वाईट असो. म्हणून आम्ही प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून माणसांची समजूत घालतो; देवाला तर आम्ही प्रकट झालोच आहोत; आणि तुमच्या सदसद्विवेकबुद्धीतही प्रकट झालो आहोत अशी आशा मी धरतो. आम्ही तुमच्याजवळ आपली प्रशंसा पुन्हा करत नाही, तर तुम्हांला आमच्याविषयी अभिमान बाळगण्याची संधी मिळावी म्हणून असे लिहितो; अशा हेतूने की, जे अंतस्थ गोष्टींबद्दल नव्हे तर बाह्य गोष्टींबद्दल अभिमान बाळगतात त्यांना तुम्हांला उत्तर देता यावे. आम्ही भ्रमिष्ट झालो असलो तर ते देवासाठी, आणि आम्ही शुद्धीवर असलो तर ते तुमच्यासाठी आहोत. कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हांला आवरून धरते. आम्ही असे समजतो की, एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले; आणि तो सर्वांसाठी ह्याकरता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वत:करता नव्हे, तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरता जगावे. तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही; आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती1 आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे. ही सगळी देवाची करणी आहे; त्याने स्वत:बरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हांला दिली; म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता, देव ख्रिस्तामध्ये स्वत:बरोबर जगाचा समेट करत होता; आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले. म्हणून देव आमच्याकडून विनवत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो; देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या-आमच्याकरता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.