शलमोनाची कीर्ती झाली ती ऐकून शबाची राणी बरोबर मोठा लवाजमा घेऊन आणि विपुल सोने, मोलवान रत्ने व मसाले उंटांवर लादून कूटप्रश्नांनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी यरुशलेमेस आली. शलमोनाकडे आल्यावर आपल्या मनात जे काही होते ते सर्व ती त्याच्यापुढे बोलली. शलमोनाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली; त्याने तिला उलगडा करून सांगितली नाही अशी एकही गोष्ट नव्हती. शलमोनाचे सगळे शहाणपण, त्याने बांधलेले मंदिर, त्याच्या मेजवानीची पक्वान्ने, त्याच्या कामदारांची आसने, त्याच्या मानकर्यांची खिदमत व त्यांचे पोशाख; त्याचे प्यालेबरदार व त्यांचे पोशाख आणि परमेश्वराच्या मंदिरात चढून जाण्याचा त्याचा तो जिना, हे सगळे पाहून ती गांगरून गेली. ती राजाला म्हणाली, “आपली करणी व ज्ञान ह्यांविषयीची कीर्ती मी आपल्या देशात ऐकली ती खरी आहे; तथापि मी येऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय ह्या गोष्टीचा मला विश्वास येईना; आता पाहावे तर आपल्या ज्ञानाची अर्धीही थोरवी माझ्या कानी आली नव्हती. आपली कीर्ती मी ऐकली आहे तिच्याहून आपली कीर्ती अधिक आहे. धन्य आपले लोक, धन्य हे आपले सेवक; त्यांना आपणासमोर सतत तिष्ठत राहून आपल्या शहाणपणाचा लाभ घडत असतो. धन्य आपला देव परमेश्वर; त्याने आपणावर प्रसन्न होऊन आपल्या वतीने आपण राजा व्हावे म्हणून आपणाला आपल्या गादीवर स्थापन केले आहे; आपल्या देवाने इस्राएलावर प्रेम करून त्याची कायमची स्थापना करण्याचे म्हणून न्यायाचे व नीतीचे पालन करण्यासाठी त्याने आपणाला राजा केले आहे.” तिने राजाला एकशे वीस किक्कार सोने, विपुल सुगंधी द्रव्ये व बहुमोल रत्ने नजर केली; शबाच्या राणीने शलमोन राजाला जी सुगंधी द्रव्ये नजर केली त्यांच्यासारखी पुन्हा कधी कोठून आली नाहीत. हूरामाचे कामदार व शलमोनाचे कामदार ओफीर येथून सोने आणीत, त्याप्रमाणेच रक्तचंदनाचे लाकूड आणि बहुमोल रत्नेही आणीत. राजाने रक्तचंदनाच्या लाकडाचे परमेश्वराच्या मंदिराला व राजवाड्याला चबुतरे केले; त्याप्रमाणेच गाणार्यांसाठी त्याच्या वीणा व सारंग्या बनवल्या; असल्या वस्तू त्यापूर्वी यहूदा देशात पाहण्यात आल्या नव्हत्या. शबाच्या राणीने जे जे मागितले ते ते सगळे शलमोन राजाने तिला तिच्या इच्छेप्रमाणे दिले; शिवाय तिने जो नजराणा आणला होता त्याच्याइतक्या मोलाची देणगी तिला दिली. मग ती आपल्या परिवारासह स्वदेशी परत गेली.
२ इतिहास 9 वाचा
ऐका २ इतिहास 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ इतिहास 9:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ