YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 7:1-10

२ इतिहास 7:1-10 MARVBSI

शलमोनाने प्रार्थना करणे संपवल्यावर स्वर्गातून अग्नीने येऊन होमबली व यज्ञबली भस्म केले; आणि परमेश्वराच्या तेजाने ते मंदिर भरून गेले. याजकांना परमेश्वराच्या मंदिरात जाता येईना, कारण परमेश्वराच्या तेजाने ते भरून गेले होते. अग्नी खाली आला आणि परमेश्वराचे तेज मंदिरावर फाकले तेव्हा सर्व इस्राएल लोक ते पाहत राहिले; जमिनीवरच्या फरसबंदीपर्यंत त्यांनी आपली मुखे लववून नमन केले आणि “परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे” असे म्हणून त्यांनी त्याचे उपकारस्मरण केले. मग राजाने व सर्व लोकांनी परमेश्वरासमोर यज्ञबली अर्पण केले. शलमोन राजाने बावीस हजार बैल व एक लक्ष वीस हजार मेंढरे ह्यांचा यज्ञ केला. अशा रीतीने राजाने व सर्व लोकांनी देवाचे मंदिर समर्पित केले. याजक आपापल्या स्थानी उभे राहिले; परमेश्वराची दया सनातन आहे असे लेव्यांच्या द्वारे परमेश्वराचे उपकारस्मरण करण्यासाठी जी वाद्ये दावीद राजाने परमेश्वराप्रीत्यर्थ केली होती ती घेऊन लेवीही उभे राहिले; त्यांच्यापुढे याजक कर्णे वाजवू लागले आणि सर्व इस्राएल लोक उभे राहिले. त्या दिवशी राजाने परमेश्वराच्या मंदिराच्या पुढल्या अंगणाचा मध्यभाग पवित्र करून तेथे होमबली, अन्नबली आणि शांत्यर्पणाची चरबी अर्पण केली; कारण शलमोनाने केलेल्या पितळेच्या वेदीवर होमबली, अन्नबली आणि चरबी ह्यांचा समावेश होईना. त्या प्रसंगी शलमोनाने व त्याच्याबरोबर सर्व इस्राएल लोकांनी सात दिवस महोत्सव केला; हमाथाच्या घाटापासून मिसराच्या नाल्यापर्यंतच्या इस्राएलाचा मोठा जमाव जमला होता. आठव्या दिवशी त्यांनी उत्सवाचा समारोप केला; त्यांनी वेदीच्या समर्पणाप्रीत्यर्थ सात दिवस व उत्सवाप्रीत्यर्थ सात दिवस पाळले. राजाने सातव्या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी लोकांना आपापल्या डेर्‍यांकडे जाण्यास निरोप दिला; परमेश्वराने दाविदावर, शलमोनावर व आपल्या इस्राएल प्रजेवर जी कृपा केली होती तिच्यामुळे ते आनंदित, हर्षितचित्त झाले होते.