YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 36:1-10

२ इतिहास 36:1-10 MARVBSI

मग देशातल्या लोकांनी योशीयाचा पुत्र यहोआहाज ह्याला त्याच्या जागी यरुशलेमेत राजा केले. यहोआहाज राज्य करू लागला तेव्हा तो तेवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत तीन महिने राज्य केले. मिसराच्या राजाने यरुशलेमेत येऊन त्याला पदच्युत केले व देशावर त्याने शंभर किक्कार रुपे व एक किक्कार सोने एवढी खंडणी बसवली. मिसरच्या राजाने त्याचा भाऊ एल्याकीम ह्याला यहूदा व यरुशलेम ह्यांवर राजा केले व त्याचे नाव बदलून यहोयाकीम असे ठेवले. त्याचा भाऊ यहोआहाज ह्याला नखो मिसर देशास घेऊन गेला. यहोयाकीम राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता व त्याने यरुशलेमेत अकरा वर्षे राज्य केले; त्याने आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते केले. त्याच्यावर बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने स्वारी केली व त्याला बाबेलास घेऊन जाण्यासाठी त्याने त्याच्या पायांत बेड्या ठोकल्या. नबुखद्नेस्सराने परमेश्वराच्या मंदिरातली पात्रे बाबेलास नेऊन तेथील आपल्या मंदिरात ठेवली. यहोयाकीमाची बाकीची कृत्ये, त्याने केलेली अमंगळ कृत्ये, त्याच्या ठायी आढळून आलेले दुष्कर्म ही सर्व इस्राएल व यहूदा ह्यांच्या राजांच्या बखरीत लिहिली आहेत; त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोयाखीन1 हा राजा झाला. यहोयाखीन आठ2 वर्षांचा असता राज्य करू लागला; त्याने यरुशलेमेत तीन महिने व दहा दिवस राज्य केले; परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. वर्षारंभी नबुखद्नेस्सराने सैन्य पाठवून तो व त्याच्याबरोबर परमेश्वराच्या मंदिरातली मोलवान पात्रे ही बाबेलास आणली आणि त्याचा भाऊ सिद्कीया ह्याला यहूदा व यरुशलेम ह्यांवर राजा केले.