YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 35:20-27

२ इतिहास 35:20-27 MARVBSI

त्यानंतर योशीयाने मंदिराची सिद्धता केल्यावर मिसरचा राजा नखो हा फरात नदीजवळील कर्कमीश नगरावर स्वारी करण्यास निघाला; तेव्हा योशीया त्याच्याशी सामना करण्यास गेला. पण त्याने त्याच्याकडे आपले वकील पाठवून सांगितले की, “यहूदाच्या राजा, मला तुझ्याशी काय कर्तव्य आहे? आज मी तुझ्यावर नव्हे तर ज्या घराण्याशी माझे वैर आहे त्यावर स्वारी करण्यास निघालो आहे; देवाने मला त्वरा करण्यास सांगितले आहे, तर माझ्याबरोबर देव आहे, त्याच्याशी विरोध करू नकोस; त्याने तुझा नाश करावा असे न होवो.” तथापि योशीया त्याच्याकडून आपला मोर्चा न फिरवता त्याच्याशी लढण्यास वेशांतर करून गेला; देवाचे वचन नखोच्या द्वारे प्राप्त झाले होते ते न जुमानता तो मगिद्दोच्या खोर्‍यात युद्ध करण्यास आला. तिरंदाजांनी योशीया राजाला बाण मारले तेव्हा तो आपल्या सेवकांना म्हणाला, “मी घायाळ झालो आहे, मला येथून घेऊन चला.” तेव्हा त्याच्या सेवकांनी त्याला रथावरून उतरवून त्याच्या दुसर्‍या रथावर बसवले व यरुशलेमेस नेले; तेथे तो मृत्यू पावला व त्यांनी त्याला त्याच्या पूर्वजांच्या कबरस्तानात मूठमाती दिली; तेव्हा सर्व यहूदा व यरुशलेम ह्यांनी योशीयासाठी शोक केला. यिर्मयाने योशीयाप्रीत्यर्थ विलापगीत रचले; सर्व गाणारे व गाणार्‍या आपल्या विलापगीतात योशीयाचे वर्णन आजवर करीत आहेत; त्यांची ही गीते इस्राएल लोकांत निरंतर गाण्याचा ठराव करण्यात आला, आणि ती विलापगीतांत नमूद केली आहेत. योशीयाची बाकीची कृत्ये आणि परमेश्वराच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याने केलेली सत्कृत्ये, म्हणजे अथपासून इतिपर्यंत त्याची सर्व कृत्ये इस्राएल व यहूदा ह्यांच्या राजांच्या बखरींत लिहिली आहेत.