योशीयाने परमेश्वराप्रीत्यर्थ यरुशलेमेत वल्हांडण सण पाळला; पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस वल्हांडणाचा यज्ञपशू मारला. त्याने याजकांच्या सेवेचा क्रम लावून दिला आणि परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यास त्यांना प्रोत्साहन दिले. जे लेवी सर्व इस्राएल लोकांना शिकवत असत व परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र झाले होते त्यांना त्याने सांगितले की, “इस्राएलाचा राजा दावीद ह्याचा पुत्र शलमोन ह्याने बांधलेल्या मंदिरात पवित्र कोश ठेवा; ह्यापुढे तुम्हांला आपल्या खांद्यांवर बोजा वागवण्याची जरूरी नाही; तर आता तुम्ही आपला देव परमेश्वर व त्याची प्रजा इस्राएल ह्यांची सेवा करा. इस्राएलाचा राजा दावीद व त्याचा पुत्र शलमोन ह्या दोघांनी लिहून ठेवलेल्या विधींना अनुसरून आपल्या पितृकुळांप्रमाणे आपापल्या क्रमानुसार सेवा करण्यास सिद्ध व्हा. जे तुमचे भाऊबंद आहेत त्यांच्या पितृकुळांच्या विभागांप्रमाणे पवित्रस्थानी तुम्ही उभे राहा, म्हणजे त्यांच्या एकेका भागाप्रीत्यर्थ लेव्यांच्या पितृकुळातील एकेका भागाने सेवा करावी. वल्हांडणाचा यज्ञपशू मारा, आपणांस पवित्र करा आणि मोशेच्या द्वारे सांगितलेल्या परमेश्वराच्या वचनानुसार वागण्यास आपल्या बांधवांना सिद्ध करा.” जे लोक तेथे हजर होते त्या सर्वांना योशीयाने वल्हांडणाच्या यज्ञासाठी राजाच्या मालमत्तेतून तीस हजार शेरडेमेढरे व तीन हजार बैल दिले. सरदारांनी लोकांना, याजकांना व लेव्यांना स्वेच्छार्पणे दिली. देवाच्या मंदिराचे कारभारी हिल्कीया, जखर्या व यहीएल ह्यांनी वल्हांडणाच्या यज्ञांसाठी याजकांना दोन हजार सहाशे शेरडेमेंढरे व तीनशे बैल दिले. कोनन्या व त्याचे बंधू शमाया व नथनेल, हशब्या, यइएल व योजाबाद ह्या लेव्यांच्या प्रमुखांनी लेव्यांना पाच हजार शेरडेमेंढरे व पाचशे बैल वल्हांडणाच्या यज्ञांसाठी दिले. ह्या प्रकारे उपासनेची सिद्धता होऊन राजाज्ञेप्रमाणे याजक आपापल्या स्थानी आणि लेवी आपापल्या क्रमानुसार उभे राहिले. मग वल्हांडणाचे यज्ञपशू वधले; बली देणार्याच्या हातून रक्त घेऊन याजक ते शिंपडत होते आणि लेवी त्या पशूंची कातडी काढत होते. मोशेच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे परमेश्वराला अर्पण करण्यास लोकांच्या पितृकुळांच्या विभागाप्रमाणे देता यावी म्हणून ही होमार्पणे त्यांनी निराळी ठेवली. बैलांचेही त्यांनी तसेच केले. त्यांनी वल्हांडणाच्या यज्ञपशूचे मांस विधीप्रमाणे भाजले आणि पवित्र अर्पणे त्यांनी पातेल्यांत, हंड्यांत व कढयांत शिजवून लोकांना लागलीच पोचती केली. नंतर त्यांनी स्वत:साठी व याजकांसाठी तयारी केली, कारण अहरोनाचे वंशज जे याजक ते रात्र पडेपर्यंत होमबली व चरबी अर्पण करण्यात गुंतले होते; म्हणून लेव्यांनी स्वत:साठी व अहरोनवंशज ह्यांच्यासाठी तयारी केली. दावीद, आसाफ, हेमान आणि राजाचा द्रष्टा यदूथून ह्यांच्या आज्ञेप्रमाणे आसाफ वंशातले गायक आपापल्या ठिकाणी होते, आणि द्वारपाळ प्रत्येक द्वाराजवळ होते; त्यांना आपले काम सोडून जावे लागले नाही, कारण त्यांचे भाऊबंद जे लेवी त्यांनी त्यांच्यासाठी तयारी केली.
२ इतिहास 35 वाचा
ऐका २ इतिहास 35
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ इतिहास 35:1-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ