त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि त्यांची दुरुस्ती केली. मग त्याने याजकांना व लेव्यांना आणून पूर्वेकडील चौकात जमा केले; आणि तो त्यांना म्हणाला, “लेव्यांनो, माझे ऐका! तुम्ही स्वत: पवित्र व्हा आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचे मंदिर पवित्र करा; पवित्रस्थानातून सर्व अमंगलता दूर करा. आपल्या पूर्वजांनी अपराध करून आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते केले व त्याला सोडून दिले; परमेश्वराच्या निवासस्थानापासून आपली तोंडे फिरवून त्याकडे त्यांनी पाठ फिरवली. त्याप्रमाणेच त्यांनी देवडीचे दरवाजे बंद केले, दीप मालवले आणि पवित्रस्थानात इस्राएलाच्या देवाप्रीत्यर्थ धूप जाळला नाही की होमबली अर्पण केले नाहीत. म्हणून परमेश्वराचा क्रोध यहूदा व यरुशलेम ह्यांवर भडकला; त्याने त्यांना दहशत व विस्मय ह्यांस कारण केले आहे व ते धिक्कारास पात्र झाले आहेत हे तुम्ही डोळ्यांनी पाहत आहात. ह्यामुळे आमच्या वाडवडिलांचा तलवारीने वध झाला; आमचे पुत्र, कन्या व स्त्रिया पाडाव होऊन गेल्या. आता माझ्या मनात आहे की इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याशी आपण करार करावा, म्हणजे त्याचा आमच्यावरील संताप दूर होईल. मुलांनो, आता हयगय करू नका, कारण तुम्ही परमेश्वरासमोर उभे राहावे, त्याची सेवाचाकरी करावी व त्याचे सेवक होऊन धूप जाळावा म्हणून परमेश्वराने तुम्हांला निवडले आहे.” मग लेवी उठून उभे राहिले ते हे : कहाथी वंशातले महथ बिन अमासय व योएल बिन अजर्या; मरारी वंशातले कीश बिन अब्दी व अजर्या बिन यहल्लेलेल; गेर्षोनी वंशातले यवाह बिन जिम्मा आणि एदेन बिन यवाह; अलीसाफानाच्या वंशातले शिम्री व ईयेल; आसाफाच्या वंशातले जखर्या व मत्तन्या; हेमान वंशातले यइएल व शिमी; यदूथूनाच्या वंशातले शमाया व उज्जीएल. त्यांनी आपल्या भाऊबंदांना एकत्र जमवून स्वतःस पवित्र केले, आणि परमेश्वराच्या वचनानुसार राजाने आज्ञा केली होती तिच्याप्रमाणे परमेश्वराच्या मंदिराच्या शुद्धीसाठी ते मंदिरात गेले. याजक परमेश्वराच्या मंदिराचा गाभारा शुद्ध करण्यासाठी त्यात गेले. आत जाऊन परमेश्वराच्या मंदिरात जेवढ्या अशुद्ध वस्तू त्यांना सापडल्या तेवढ्या सर्व बाहेर काढून परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात त्यांनी नेल्या. लेव्यांनी त्या उचलून बाहेर नेऊन किद्रोन ओहळात टाकल्या. पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस त्यांनी पवित्रीकरणास आरंभ केला व त्याच महिन्याच्या अष्टमीस ते परमेश्वराच्या देवडीपर्यंत आले; त्यांनी परमेश्वराचे मंदिर आठ दिवसांत पवित्र केले; पहिल्या महिन्याच्या सोळाव्या दिवशी सर्व काम त्यांनी समाप्त केले. मग ते राजमंदिरी हिज्कीया राजाकडे जाऊन त्याला म्हणाले, “आम्ही परमेश्वराचे सर्व मंदिर, होमवेदी व तिची सर्व उपकरणे आणि समर्पित भाकरीचे मेज व त्याची सर्व उपकरणे शुद्ध केली आहेत. जेवढी पात्रे आहाज राजाने आपल्या कारकिर्दीत अत्याचार करून फेकून दिली होती, तेवढी सर्व आम्ही नीट करून पवित्र केली आहेत; पाहा, ती परमेश्वराच्या वेदीपुढे आहेत.” मग हिज्कीया राजा सकाळी उठून नगराचे सर्व सरदार एकत्र करून परमेश्वराच्या मंदिरात गेला. तेव्हा राज्य, पवित्रस्थान व यहूदा ह्यांच्यासाठी त्यांनी सात गोर्हे, सात एडके, सात कोकरे व पापार्पणासाठी सात बोकड आणले. मग ते परमेश्वराच्या वेदीवर अर्पावेत अशी अहरोन वंशातील याजकांना त्याने आज्ञा केली. मग त्यांनी ते गोर्हे कापले आणि याजकांनी त्यांचे रक्त घेऊन वेदीवर शिंपडले. त्यांनी मेंढरे मारून त्यांचेही रक्त वेदीवर शिंपडले; त्याप्रमाणेच कोकरेही मारून त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. आणि त्यांनी पापार्पणाचे बकरे राजाच्या व मंडळीच्या समोर आणले; त्यांवर त्यांनी आपले हात ठेवले; मग याजकांनी ते कापून इस्राएलाबद्दल प्रायश्चित्त होण्यासाठी त्यांचे रक्त पापबली म्हणून वेदीवर शिंपडले; सर्व इस्राएलासाठी होमार्पण व पापार्पण करावे अशी राजाज्ञा झाली. दावीद व राजाचा द्रष्टा गाद आणि नाथान संदेष्टा ह्यांच्या आज्ञेप्रमाणे झांजा, सारंग्या व वीणा वाजवण्यासाठी लेव्यांना परमेश्वराच्या मंदिरात उभे केले; ही आज्ञा परमेश्वराने आपल्या संदेष्ट्यांच्या द्वारे केली होती. दाविदाची वाद्ये घेऊन लेवी उभे राहिले व याजक कर्णे घेऊन उभे राहिले. मग हिज्कीयाने वेदीवर होमबली अर्पण करण्याची आज्ञा दिली. होमार्पणास आरंभ झाला तेव्हा परमेश्वराच्या स्तोत्रासही आरंभ झाला, आणि कर्णे व इस्राएलाचा राजा दावीद ह्याची वाद्ये वाजू लागली. सर्व मंडळी आराधना करू लागली, गायक गाऊ लागले व कर्णेकरी कर्णे वाजवू लागले; होमार्पणाची समाप्ती होईपर्यंत हे सर्व चालले होते. यज्ञाची समाप्ती झाली तेव्हा राजाने व त्याच्याबरोबरच्या सर्व लोकांनी नमन करून आराधना केली. मग हिज्कीया राजा व सरदार ह्यांनी लेव्यांना आज्ञा केली की दावीद व आसाफ द्रष्टा ह्यांची कवने गाऊन परमेश्वराची स्तुती करा. तेव्हा त्यांनी आनंदाने स्तुती केली व आपली मस्तके लववून आराधना केली. मग हिज्कीया म्हणाला, “आता तुम्ही आपणांस परमेश्वराला समर्पण केले आहे तर जवळ येऊन परमेश्वराच्या मंदिरात यज्ञ व उपकारस्मरणाची अर्पणे आणा.” तेव्हा मंडळीने यज्ञ व उपकारस्मरणाची अर्पणे आणली आणि जे उदार मनाचे होते त्यांनी होमार्पणे आणली. मंडळीतील लोकांनी यज्ञपशू आणले, त्यांची संख्या सत्तर बैल, शंभर मेंढे व दोनशे कोकरे एवढी होती; ही सर्व परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पणासाठी होती. सहाशे बैल व तीन हजार शेरडेमेंढरे एवढे वाहिलेले पशू होते. पण याजकांची संख्या फार थोडी असल्यामुळे त्या सर्व होमबलींची कातडी काढता येईना म्हणून काम समाप्त होईपर्यंत व याजक आपणांस पवित्र करीपर्यंत त्यांचे बांधव लेवी ह्यांनी त्यांना मदत केली; कारण आपणांस पवित्र करण्याच्या कामी याजकांपेक्षा लेवी विशेष सात्त्विक मनाचे होते. होमबली पुष्कळ होते आणि शांत्यर्पणांच्या पशूंची चरबीही पुष्कळ होती; प्रत्येक होमबलीबरोबर त्यांनी पेयार्पणेही दिली. ह्या प्रकारे परमेश्वराच्या मंदिरातील उपासना व्यवस्थितपणे स्थापण्यात आली. तेव्हा हिज्कीया व सर्व प्रजा आनंदित झाली, कारण देवाने आपल्या लोकांसाठी ह्या सर्व गोष्टींची सिद्धता केली होती; हे अचानक घडून आले.
२ इतिहास 29 वाचा
ऐका २ इतिहास 29
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ इतिहास 29:3-36
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ