२ इतिहास 19
19
यहोशाफाटाला येहू द्रष्ट्याचे ताडन
1यहूदाचा राजा यहोशाफाट सुखरूपपणे आपल्या घरी यरुशलेमेस परत गेला.
2तेव्हा हनानी द्रष्ट्याचा पुत्र येहू हा यहोशाफाट राजाला सामोरा जाऊन म्हणाला, “तू दुष्टांचे साहाय्य करावे व परमेश्वराच्या द्वेष्ट्यावर प्रीती करावी काय? ह्यामुळे परमेश्वराचा तुझ्यावर कोप भडकला आहे.
3तथापि तुझ्या ठायी काही चांगल्या गोष्टी दिसून आल्या आहेत; तू देशातून अशेरा मूर्तींचा नाश केला आहेस व आपले मन देवाच्या भजनी लावले आहेस.” यहोशाफाट न्यायाधीशांची नेमणूक करतो 4यहोशाफाट यरुशलेमेस राहत असे; त्याने बैर-शेब्यापासून एफ्राइमाच्या डोंगरप्रदेशापर्यंत पुन्हा आपल्या लोकांमध्ये फिरून त्यांना त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्याकडे परत आणले.
5त्याने यहूदाच्या प्रत्येक तटबंदी नगरात शास्ते नेमले;
6त्याने शास्त्यांना सांगितले, “तुम्ही काय करता ह्याचा विचार करा; तुम्ही न्याय कराल तो मानवासाठी नाही तर परमेश्वरासाठी करायचा आहे; न्याय करताना तो तुमच्याबरोबर असणार.
7तर परमेश्वराची भीती तुमच्या ठायी असू द्या; तुम्ही जे कराल ते सांभाळून करा, कारण आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे काही अधर्म नाही; तो कोणाचे तोंड पाहून न्याय करीत नाही की लाच घेत नाही.”
8यरुशलेमेतही यहोशाफाटाने लेवी व याजक आणि इस्राएलाच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांना परमेश्वराच्या बाबतीत न्याय करण्यास व वादाचा निकाल करण्यास नेमले. मग ते यरुशलेमेत परत आले.
9त्याने त्यांना बजावून सांगितले की, “परमेश्वराचे भय बाळगून खर्या व निष्कपट मनाने असे करा.
10तुमचे भाऊबंद जे आपापल्या नगरात राहत आहेत, त्यांच्यापैकी कोणाचा वाद तुमच्यापुढे आला तर, तो मग खुनाचा असो; किंवा नियमशास्त्र, आज्ञा, नियम व निर्णय ह्यांच्यासंबंधीचा असो; तुम्ही त्यांना असे बजावून सांगा की तुम्ही परमेश्वराचा अपराध करू नका; केला तर तुमच्यावर व तुमच्या बांधवांवर त्याचा कोप होईल; असे करा म्हणजे तुम्हांला दोष लागणार नाही.
11पाहा, परमेश्वराविषयीच्या सर्व प्रकरणांत मुख्य याजक अमर्या ह्याला तुमच्यावर नेमले आहे, आणि राजासंबंधीच्या सर्व प्रकरणांत यहूदा वंशाचा सरदार जबद्या बिन इस्राएल ह्याला तुमच्यावर नेमले आहे; आणि लेवी हेही तुमच्या दिमतीस असतील. हिंमत धरा, आपले कर्तव्य करा, परमेश्वर भल्यांच्या बरोबर असणार.”
सध्या निवडलेले:
२ इतिहास 19: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.