YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 8:1-18

१ शमुवेल 8:1-18 MARVBSI

शमुवेलाने वृद्ध झाल्यावर आपल्या पुत्रांना इस्राएलाचे न्यायाधीश म्हणून नेमले. त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव योएल असे होते आणि दुसर्‍याचे नाव अबीया असे होते; बैर-शेबा येथे ते न्यायनिवाडा करीत असत; पण त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालले नाहीत; त्यांना पैशाचा लोभ लागून ते लाच खात व न्यायनिवाडा विपरीत करीत. नंतर इस्राएलाचे सर्व वडील जमा होऊन रामा येथे शमुवेलाकडे आले. ते त्याला म्हणाले, “पाहा, आता तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाहीत; तर आता इतर सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्यायनिवाडा करायला आमच्यावर एक राजा नेमा.” “आमचा न्यायनिवाडा करायला आम्हांला एक राजा द्या,” असे ते म्हणाले त्यामुळे शमुवेलास वाईट वाटले. मग शमुवेलाने परमेश्वराची प्रार्थना केली. तेव्हा परमेश्वर शमुवेलाला म्हणाला, “लोक जे तुला सांगत आहेत ते सगळे ऐक; कारण त्यात ते तुझा धिक्कार करत नाहीत, तर मी त्यांचा राजा नसावे म्हणून ते माझाच धिक्कार करत आहेत. मी त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्याशी त्यांनी असेच वर्तन केले आहे; त्यांनी मला सोडून अन्य देवांची उपासना केली; तसेच ते तुझ्याशी वर्तन करत आहेत. तर आता त्यांचे म्हणणे ऐक; पण त्यांची चांगली कानउघाडणी कर आणि त्यांच्यावर जो राजा राज्य करील त्याची सत्ता कशी काय चालते ते त्यांना दाखवून दे.” मग ज्या लोकांनी त्याच्याकडे राजा मागितला होता त्यांना शमुवेलाने परमेश्वराचे सर्व म्हणणे कळवले. तो म्हणाला, “तुमच्यावर जो राजा राज्य करील तो अशी सत्ता चालवील की तो तुमच्या पुत्रांना धरून आपले रथ व घोडे ह्यांची चाकरी करायला ठेवील, आणि ते त्याच्या रथांपुढे धावतील. त्यांतून कित्येक हजाराहजारांवर व पन्नासापन्नासांवर नायक म्हणून तो नेमील; कित्येकांना आपली शेते नांगरायला, कापायला व आपल्या लढाईची व रथाची हत्यारे करण्याच्या कामाला लावील. तो तुमच्या कन्यांना धरून हलवाइणी, स्वयंपाकिणी व भटारणी करील. तो तुमची उत्तम उत्तम शेते, द्राक्षांचे मळे व जैतुनांचे मळे घेऊन आपल्या नोकरांना देईल. तो तुमचे धान्य व द्राक्षांचे मळे ह्यांचा एक दशमांश घेऊन आपले खोजे व चाकर ह्यांना देईल. तो तुमचे दास व दासी, तुमची खिल्लारे1 व गाढवे धरून आपल्या कामावर लावील. तो तुमच्या शेरडामेंढरांचा एक दशमांश घेईल; तुम्ही त्याचे दास व्हाल. त्या दिवशी तुम्ही निवडून घेतलेल्या राजाविषयी गार्‍हाणी कराल, पण परमेश्वर त्या दिवशी तुम्हांला उत्तर देणार नाही.”