YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 28:1-19

१ शमुवेल 28:1-19 MARVBSI

त्या काळी पलिष्ट्यांनी इस्राएल लोकांशी लढण्यासाठी आपली सैन्ये एकवटली तेव्हा आखीश दाविदाला म्हणाला, “हे पक्के समज की तुला आपल्या लोकांसह लढायला माझ्या सैन्याबरोबर यावे लागणार.” दावीद आखीशाला म्हणाला, “आपला दास काय करील ते आपल्याला आता समजून येईल.” आखीश दाविदाला म्हणाला, “म्हणूनच मी तुला माझे शिर सलामत राखायला कायमचा ठेवून घेतो.” शौल आणि एन-दोर येथील भूतविद्याप्रवीण स्त्री शमुवेल मृत्यू पावला होता; सर्व इस्राएल लोकांनी त्याच्यासाठी मोठा शोक करून त्याचे नगर रामा येथे त्याला मूठमाती दिली होती. शौलाने दैवज्ञ व मांत्रिक ह्यांना देशातून घालवून दिले होते. पलिष्ट्यांनी एकत्र येऊन शूनेम येथे छावणी दिली; इकडे शौलाने सर्व इस्राएल जमा करून गिलबोवा येथे छावणी दिली. पलिष्ट्यांचे सैन्य पाहून शौल घाबरला. त्याच्या मनाचा थरकाप झाला. शौलाने परमेश्वराला प्रश्‍न विचारले असता परमेश्वराने स्वप्ने, उरीम अथवा संदेष्टे अशा कोणाच्याही द्वारे उत्तर दिले नाही. तेव्हा शौल आपल्या सेवकांना म्हणाला, “एखादी भूतविद्याप्रवीण स्त्री शोधा म्हणजे मी तिच्याकडे जाऊन प्रश्‍न विचारीन.” त्याचे चाकर त्याला म्हणाले, “पाहा, एन-दोर येथे एक भूतविद्याप्रवीण स्त्री राहत आहे.” मग शौलाने आपला वेश पालटून दुसरे कपडे घातले आणि दोन माणसे बरोबर घेऊन तो रातोरात त्या स्त्रीकडे गेला; तो तिला म्हणाला, “आपल्या भूतविद्येचा प्रयोग करून ज्या कोणाचे मी नाव घेईन त्याला उठवून माझ्याकडे आण.” ती स्त्री त्याला म्हणाली, “शौलाने काय केले ते तुला ठाऊकच आहे; भूतविद्याप्रवीण व चेटकी ह्यांचे त्याने देशातून उच्चाटन केले आहे; आता मला मारून टाकावे म्हणून माझ्या जिवाला पाश का लावतोस?” शौलाने परमेश्वराची शपथ घेऊन तिला म्हटले, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, ह्या बाबतीत तुला काहीएक दंड होणार नाही.” त्या स्त्रीने विचारले, “मी तुझ्यासाठी कोणाला उठवून आणू?” तो म्हणाला, “शमुवेलाला उठवून आण.” त्या स्त्रीने शमुवेलाला पाहिले, तेव्हा मोठ्याने किंकाळी फोडून ती शौलाला म्हणाली, “आपण मला का फसवले? आपण शौल आहात.” राजाने तिला म्हटले, “भिऊ नकोस, तुला काय दिसते?” ती शौलाला म्हणाली, “कोणी दैवत पृथ्वीतून वर येताना दिसत आहे.” त्याने तिला विचारले, “त्याचे स्वरूप कसे आहे?” ती म्हणाली, “एक वृद्ध पुरुष उठून येत आहे; त्याने झगा घातला आहे.” तेव्हा शौलाने ताडले की तो शमुवेल असावा; म्हणून त्याने भूमीपर्यंत लवून नमस्कार केला. शमुवेल शौलाला म्हणाला, “तू मला वर बोलावून माझ्या शांतीचा भंग का केलास?” शौल म्हणाला, “मी मोठ्या संकटात पडलो आहे; पलिष्टी माझ्याशी लढत आहेत, आणि देवाने माझा त्याग केला आहे, आता मला तो संदेष्ट्यांच्या अथवा स्वप्नांच्या द्वारे माझ्या प्रश्‍नाचे उत्तर देत नाही; तेव्हा मी आता काय करावे ते तू मला सांगावेस म्हणून मी तुला बोलावले आहे.” शमुवेल म्हणाला, “परमेश्वर तुझा त्याग करून तुझा शत्रू झाला आहे, तर तू मला कशाला प्रश्‍न करतोस?” परमेश्वराने माझ्या द्वारे मोशेला सांगितले होते तसेच त्याने आपल्या मनोदयाप्रमाणे केले आहे; परमेश्वराने तुझ्या हातून राज्य हिसकावून घेऊन तुझा शेजारी दावीद ह्याला दिले आहे. तू परमेश्वराची वाणी ऐकली नाहीस व त्याच्या कोपानुसार तू अमालेकास शासन केले नाहीस, म्हणून आज परमेश्वर तुझ्याशी असा वागला आहे. एवढेच नव्हे तर परमेश्वर तुझ्याबरोबर इस्राएल लोकांनाही पलिष्ट्यांच्या हाती देईल; उद्या तू आपल्या पुत्रांसह माझ्याकडे येशील; परमेश्वर इस्राएलाचे सैन्य पलिष्ट्यांच्या हाती देईल.”