YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 27

27
दाविदाचे पलिष्ट्यांमध्ये वास्तव्य
1दावीद आपल्या मनात म्हणाला, “मी कोणत्या तरी दिवशी शौलाच्या हातून मरणारच तर पलिष्ट्यांच्या देशात पळून जावे ह्यापेक्षा दुसरा चांगला उपाय नाही; अशाने शौल माझ्यासंबंधाने निराश होऊन इस्राएल देशाच्या कोणत्याही प्रांतात माझा ह्यापुढे शोध करणार नाही; ह्याप्रमाणे मी त्याच्या हातून सुटून जाईन.”
2तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरचे सहाशे लोक निघून गथचा राजा मावोखपुत्र आखीश ह्याच्याकडे गेले.
3दावीद व त्याचे लोक आपापल्या परिवारांसह गथात आखीशाच्या जवळ राहिले; दावीद आपल्या दोन स्त्रिया म्हणजे इज्रेलीण अहीनवाम व नाबालाची स्त्री कर्मेलीण अबीगईल ह्यांना घेऊन राहिला.
4दावीद गथ येथे पळून गेला हे वर्तमान शौलाला समजल्यावर त्याने त्यानंतर त्याचा शोध केला नाही.
5दावीद आखीशास म्हणाला, “माझ्यावर आपली कृपादृष्टी असेल तर एखाद्या खेडेगावात मला जागा द्या म्हणजे मी तेथे राहीन; आपल्या दासाने आपल्याबरोबर राजधानीत का राहावे?”
6तेव्हा आखीशाने त्या दिवशी त्याला सिकलाग हे नगर दिले; म्हणून सिकलाग हे नगर आजवर यहूदाच्या राजाचे आहे.
7पलिष्ट्यांच्या देशात दावीद जाऊन राहिला त्या घटनेस पुरे एक वर्ष चार महिने झाले.
8मग दावीद व त्याचे लोक ह्यांनी गशूरी, गिरजी व अमालेकी ह्यांच्यावर स्वारी केली; शूराकडून मिसर देशाकडे जाताना जो प्रदेश लागतो त्यात ही राष्ट्रे प्राचीन काळापासून वसली होती.
9दाविदाने त्या प्रदेशावर मारा केला आणि तेथल्या कोणाही स्त्रीपुरुषास जिवंत सोडले नाही, आणि तेथली शेरडेमेंढरे, गाईबैल, गाढवे, उंट आणि वस्त्रप्रावरणे घेऊन तो परत आखीशाकडे गेला.
10आखिशाने विचारले, “आज तू कोणावर स्वारी केलीस?” दावीद म्हणाला, “यहूदाचा दक्षिण प्रांत, यरहमेल्यांचा दक्षिण प्रांत व केन्यांचा दक्षिण प्रांत ह्यांवर.”
11दाविदाने गथ येथे आणायला कोणी स्त्री किंवा पुरुष जिवंत ठेवला नाही; तो म्हणाला, “त्यांना आणले असते तर दाविदाने असे असे केले अशी त्यांनी आमची चहाडी केली असती.” तो पलिष्ट्यांच्या देशात राहिला तोपर्यंत त्याचा असाच क्रम चालू राहिला.
12आखीशाने दाविदाच्या बोलण्यावर भरवसा ठेवून म्हटले, “ह्याने इस्राएल लोकांना आपला अगदी वीट येईलसे केले आहे; तर आता हा निरंतर आपला दास होऊन राहील.”

सध्या निवडलेले:

१ शमुवेल 27: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन