YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 25:33-42

१ शमुवेल 25:33-42 MARVBSI

धन्य तुझ्या दूरदर्शीपणाची! तू स्वत: धन्य! तू आज मला माझ्या हाताने रक्तपात करण्यापासून व सूड उगवण्यापासून आवरले आहेस, वस्तुतः इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने तुला उपद्रव करण्यापासून मला आवरले आहे; त्याच्या जीविताची शपथ, तू मला तातडीने भेटायला आली नसतीस तर खरोखर सकाळी उजाडेपर्यंत नाबालाचा एक पुरुषही जिवंत राहिला नसता.” नंतर तिने जे काही आणले होते त्याचा स्वीकार करून दावीद तिला म्हणाला, “आपल्या घरी सुखाने जा; पाहा, मी तुझा शब्द ऐकला आहे व तुझी विनंती मान्य केली आहे.” मग अबीगईल नाबालाकडे गेली, तेव्हा त्याने आपल्या घरी राजाच्यासारखी मेजवानी केली आहे असे तिने पाहिले; त्याचे चित्त रमून गेले होते. तो फार झिंगला होता; ह्यास्तव सकाळी उजाडेपर्यंत तिने त्याला कमीजास्त काही सांगितले नाही. सकाळी नाबालाची नशा उतरल्यावर त्याच्या स्त्रीने ह्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या; तेव्हा त्याचे हृदय मृतवत झाले, तो पाषाणासारखा झाला. नंतर दहा दिवसांनी परमेश्वराकडून नाबालास असा तडाका मिळाला की तो मृत्यू पावला. नाबालाच्या मृत्यूचे वृत्त ऐकून दावीद म्हणाला, “नाबालाच्या हातून माझी अप्रतिष्ठा झाली तिची दाद ज्याने घेतली आणि आपल्या दासाला घात करण्यापासून आवरले, तो परमेश्वर धन्य! परमेश्वराने नाबालाचे दुष्कर्म त्याच्याच शिरी उलटवले.” मग दाविदाने अबीगईलेशी लग्नाचे बोलणे करण्यासाठी तिच्याकडे लोक पाठवले. दाविदाचे चाकर कर्मेल येथे अबीगईलेकडे येऊन तिला म्हणाले, “तुला आपली स्त्री करण्यासाठी घेऊन यावे म्हणून दाविदाने तुझ्याकडे आम्हांला पाठवले आहे.” ती उठून भूमीपर्यंत लवून म्हणाली की, “आपली दासी माझ्या स्वामींच्या दासांचे चरण धुणारी दासी होण्यास सिद्ध आहे.” मग अबीगईल तातडीने उठून गाढवावर बसली; तिच्या पाच सख्या तिच्याबरोबर गेल्या; ती दाविदाच्या जासूदांमागून जाऊन त्याची स्त्री झाली.