शौल, तुझे भाऊ व सर्व इस्राएल लोक एला नामक खोर्यात पलिष्ट्यांशी युद्ध करीत आहेत.” दावीद सकाळीच उठला व शेरडेमेंढरे एका राखणार्याच्या हवाली करून इशायाने त्याला सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तू घेऊन गेला; सेना रणशब्द करीत रणभूमीकडे चालली असता तो सैन्याच्या छावणीजवळ जाऊन पोहचला. इस्राएलांनी व पलिष्ट्यांनी आपापल्या सेना समोरासमोर आणून युद्धास सज्ज केल्या. दावीद आपल्या सामानाचे गाठोडे सामानाची राखण करणार्यांच्या हवाली करून धावत सैन्यात गेला आणि आपल्या भावांकडे जाऊन त्याने त्यांचे क्षेमकुशल विचारले. तो त्यांच्याबरोबर बोलत असता, पलिष्ट्यांच्या गोटातून तो गथ येथील गल्याथ नावाचा पलिष्टी वीर तेथे चालून येऊन पूर्वोक्त शब्द बोलला ते दाविदाने ऐकले. त्या पुरुषाला पाहताच सर्व इस्राएल लोक अत्यंत भयभीत होऊन त्याच्यापुढून पळून गेले. इस्राएल लोक म्हणू लागले, “हा चालून आलेला पुरुष तुम्ही पाहिला ना? तो इस्राएलाची निर्भर्त्सना करायला आला आहे; जो कोणी त्याला ठार मारील त्याला राजा बहुत धन देऊन संपन्न करील, आपली कन्या त्याला देईल, आणि इस्राएलात त्याच्या बापाचे घराणे स्वतंत्र करील.” आसपास उभे असणार्या लोकांना दाविदाने विचारले, “ह्या पलिष्ट्याला मारून इस्राएलाची अप्रतिष्ठा दूर करणार्या मनुष्याला काय मिळेल? ह्या असुंती पलिष्ट्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्यात काय?” लोकांनी त्याला वरीलप्रमाणे सांगितले, म्हणजे जो कोणी त्याचा वध करील त्याला अमुक अमुक मिळेल. दावीद त्या लोकांशी बोलत होता ते त्याचा वडील भाऊ अलीयाब ह्याने ऐकले; तेव्हा तो दाविदावर संतापून म्हणाला, “येथे आलास कशाला? थोडीशी शेरडेमेंढरे आहेत ती रानात तू कोणाच्या हवाली केली आहेत? तुझी घमेंड व तुझ्या मनाचा उद्दामपणा मी जाणून आहे; तू केवळ लढाई पाहायला येथे आला आहेस.” दावीद म्हणाला, “मी काय केले? मी नुसता एक शब्द बोललो ना?” मग तो त्याच्यापासून निघून दुसर्या एकाकडे गेला व तेथेही त्याने तसेच विचारले; तेव्हा लोकांनी पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले. दावीद बोलला ते शब्द ऐकल्यावर लोकांनी ते शौलाला कळवले; व त्याने त्याला बोलावणे पाठवले. मग दावीद शौलाला म्हणाला, “त्या पलिष्ट्यामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये; आपला दास जाऊन त्याच्याशी लढेल.” शौल दाविदाला म्हणाला, “ह्या पलिष्ट्याशी लढायला तू समर्थ नाहीस, कारण तू केवळ तरुण आहेस, आणि तो बाळपणापासून कसलेला योद्धा आहे.” दावीद शौलास म्हणाला, “आपला दास आपल्या बापाची शेरडेमेंढरे राखत असता एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेले, तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्याला मारले आणि कोकराला त्याच्या जबड्यातून सोडवले; माझ्यावर त्याने झडप घातली, तेव्हा मी त्याची आयाळ धरून त्याला हाणून ठार केले. आपल्या दासाने त्या सिंहाला व अस्वलाला मारून टाकले. हा असुंती पलिष्टी त्या दोहोंपैकी एकासारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखले आहे.” दावीद आणखी म्हणाला, “ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडवले तोच मला ह्या पलिष्ट्याच्या हातून सोडवील.” तेव्हा शौल दाविदाला म्हणाला, “जा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो.”
१ शमुवेल 17 वाचा
ऐका १ शमुवेल 17
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ शमुवेल 17:19-37
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ