पलिष्टी लोकांनी युद्धासाठी आपल्या सेना एकवट केल्या आणि यहूदा देशातील सोखो ह्या ठिकाणी जमून सोखो व अजेका ह्यांच्या दरम्यान अफस-दम्मीम येथे छावणी दिली.
इकडे शौलाने आणि इस्राएल लोकांनीही एकवट होऊन एला नामक खोर्यात तळ दिला, आणि पलिष्ट्यांशी युद्ध करण्यास सैन्यरचना केली.
पलिष्टी एका बाजूच्या पहाडावर उभे राहिले, व दुसर्या बाजूच्या पहाडावर इस्राएल लोक उभे राहिले; त्या दोन डोंगरांच्या मध्ये एक खोरे होते.
तेव्हा गथ एथला गल्याथ नामक एक महावीर पलिष्ट्यांच्या छावणीतून बाहेर आला; त्याची उंची सहा हात एक वीत होती.
त्याच्या डोक्याला एक पितळी टोप होता. त्याने खवल्यासारख्या पट्ट्यांचे कवच अंगात घातले होते; त्या कवचाचे वजन पाच हजार पितळी शेकेल होते.
त्याने पायांत पितळी मोजे चढवले होते, व त्याच्या खांद्यांच्या दरम्यान एक पितळी बरची होती.
त्याच्या भाल्याचा दांडा साळ्याच्या तुरीसारखा होता; त्याच्या भाल्याचे पाते सहाशे लोखंडी शेकेल होते; त्याची ढाल वाहणारा त्याच्यापुढे चालला होता.
तो उभा राहून इस्राएल सैन्याला मोठ्याने हाक मारून म्हणाला, “तुम्ही येथे येऊन युद्धासाठी सैन्यरचना का केली आहे? मी पलिष्टी नव्हे काय? आणि तुम्ही शौलाचे नोकर ना? तुम्ही आपल्यांतला एक पुरुष निवडा, आणि त्याने माझ्याकडे यावे.
त्याने माझ्याशी लढून मला ठार मारले तर आम्ही तुमचे दास होऊ; पण माझी त्याच्यावर सरशी होऊन मी त्याला मारले, तर तुम्ही आमचे दास होऊन आमची सेवा करावी.”
तो पलिष्टी म्हणाला, “इस्राएलाच्या सर्व सैन्याला मी कस्पटासमान लेखत आहे. कोणाही पुरुषाला माझ्यापुढे येऊ द्या, म्हणजे आम्ही दोघे युद्ध करू.”
शौल व सर्व इस्राएल ह्यांनी त्या पलिष्ट्याचे हे शब्द ऐकले तेव्हा त्यांचे धैर्य खचले आणि ते फार भयभीत झाले.
आता यहूदातील बेथलेहेमच्या इशाय नामक एफ्राथ्याला दावीद नावाचा पुत्र होता. इशायास आठ पुत्र होते. तो शौलाच्या कारकिर्दीत वृद्ध व वयातीत झाला होता.
इशायाचे तीन वडील पुत्र शौलाबरोबर लढाईला गेले होते. लढाईला गेलेल्या त्या तीन पुत्रांची नावे ही : ज्येष्ठ पुत्र अलीयाब, दुसरा अबीनादाब व तिसरा शाम्मा.
सर्वांहून धाकटा दावीद होता; तिन्ही वडील पुत्र शौलाबरोबर गेले होते.
दावीद हा बेथलेहेमात आपल्या बापाची शेरडेमेंढरे राखण्यासाठी शौलाकडून जातयेत असे.
तो पलिष्टी चाळीस दिवसपर्यंत नित्य सकाळी व संध्याकाळी जवळ येऊन उभा राहत असे.
इशायाने आपला पुत्र दावीद ह्याला म्हटले, “एक एफाभर हुरडा व ह्या भाकरी घेऊन छावणीत आपल्या भावांकडे लवकर जा;
आणि हे खव्याचे दहा गोळे त्यांच्या सहस्रपतीस नेऊन दे; तुझे बंधू कसे आहेत ते पाहून त्यांच्याकडून काही खूण आण.
शौल, तुझे भाऊ व सर्व इस्राएल लोक एला नामक खोर्यात पलिष्ट्यांशी युद्ध करीत आहेत.”
दावीद सकाळीच उठला व शेरडेमेंढरे एका राखणार्याच्या हवाली करून इशायाने त्याला सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तू घेऊन गेला; सेना रणशब्द करीत रणभूमीकडे चालली असता तो सैन्याच्या छावणीजवळ जाऊन पोहचला.
इस्राएलांनी व पलिष्ट्यांनी आपापल्या सेना समोरासमोर आणून युद्धास सज्ज केल्या.
दावीद आपल्या सामानाचे गाठोडे सामानाची राखण करणार्यांच्या हवाली करून धावत सैन्यात गेला आणि आपल्या भावांकडे जाऊन त्याने त्यांचे क्षेमकुशल विचारले.
तो त्यांच्याबरोबर बोलत असता, पलिष्ट्यांच्या गोटातून तो गथ येथील गल्याथ नावाचा पलिष्टी वीर तेथे चालून येऊन पूर्वोक्त शब्द बोलला ते दाविदाने ऐकले.
त्या पुरुषाला पाहताच सर्व इस्राएल लोक अत्यंत भयभीत होऊन त्याच्यापुढून पळून गेले.
इस्राएल लोक म्हणू लागले, “हा चालून आलेला पुरुष तुम्ही पाहिला ना? तो इस्राएलाची निर्भर्त्सना करायला आला आहे; जो कोणी त्याला ठार मारील त्याला राजा बहुत धन देऊन संपन्न करील, आपली कन्या त्याला देईल, आणि इस्राएलात त्याच्या बापाचे घराणे स्वतंत्र करील.”
आसपास उभे असणार्या लोकांना दाविदाने विचारले, “ह्या पलिष्ट्याला मारून इस्राएलाची अप्रतिष्ठा दूर करणार्या मनुष्याला काय मिळेल? ह्या असुंती पलिष्ट्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्यात काय?”
लोकांनी त्याला वरीलप्रमाणे सांगितले, म्हणजे जो कोणी त्याचा वध करील त्याला अमुक अमुक मिळेल.
दावीद त्या लोकांशी बोलत होता ते त्याचा वडील भाऊ अलीयाब ह्याने ऐकले; तेव्हा तो दाविदावर संतापून म्हणाला, “येथे आलास कशाला? थोडीशी शेरडेमेंढरे आहेत ती रानात तू कोणाच्या हवाली केली आहेत? तुझी घमेंड व तुझ्या मनाचा उद्दामपणा मी जाणून आहे; तू केवळ लढाई पाहायला येथे आला आहेस.”
दावीद म्हणाला, “मी काय केले? मी नुसता एक शब्द बोललो ना?”
मग तो त्याच्यापासून निघून दुसर्या एकाकडे गेला व तेथेही त्याने तसेच विचारले; तेव्हा लोकांनी पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले.
दावीद बोलला ते शब्द ऐकल्यावर लोकांनी ते शौलाला कळवले; व त्याने त्याला बोलावणे पाठवले.
मग दावीद शौलाला म्हणाला, “त्या पलिष्ट्यामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये; आपला दास जाऊन त्याच्याशी लढेल.”
शौल दाविदाला म्हणाला, “ह्या पलिष्ट्याशी लढायला तू समर्थ नाहीस, कारण तू केवळ तरुण आहेस, आणि तो बाळपणापासून कसलेला योद्धा आहे.”
दावीद शौलास म्हणाला, “आपला दास आपल्या बापाची शेरडेमेंढरे राखत असता एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेले,
तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्याला मारले आणि कोकराला त्याच्या जबड्यातून सोडवले; माझ्यावर त्याने झडप घातली, तेव्हा मी त्याची आयाळ धरून त्याला हाणून ठार केले.
आपल्या दासाने त्या सिंहाला व अस्वलाला मारून टाकले. हा असुंती पलिष्टी त्या दोहोंपैकी एकासारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखले आहे.”
दावीद आणखी म्हणाला, “ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडवले तोच मला ह्या पलिष्ट्याच्या हातून सोडवील.” तेव्हा शौल दाविदाला म्हणाला, “जा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो.”
शौलाने आपला पेहराव दाविदाला लेववला, त्याच्या मस्तकी पितळी टोप घातला व त्याच्या अंगात चिलखत चढवले.
दावीद आपली तलवार आपल्या चिलखतावरून बांधून चालून पाहू लागला; कारण त्याला ह्यापूर्वी त्याचा सराव नव्हता. दावीद शौलाला म्हणाला, “हे घालून माझ्याने चालवत नाही, कारण मला ह्यांचा सराव नाही;” म्हणून दाविदाने ते उतरवून ठेवले.
मग त्याने आपली काठी हाती घेतली; ओहोळातून पाच गुळगुळीत गोटे वेचून आपल्या थैलीत म्हणजे धनगरी बटव्यात ठेवले, आणि आपली गोफण हाती घेऊन तो त्या पलिष्ट्याकडे गेला.
तिकडे तो पलिष्टीही दाविदाच्या जवळ आला; त्याचा शस्त्रवाहक त्याच्यापुढे चालत होता.
त्या पलिष्ट्यांनी दाविदाला न्याहाळून पाहिले तेव्हा तो त्याला तुच्छ वाटला, कारण तो केवळ अल्पवयी असून तांबूस रंगाचा व सुकुमार होता.
तो पलिष्टी दाविदाला म्हणाला, “मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन माझ्यापुढे आला आहेस?” त्या पलिष्ट्याने आपल्या देवांची नावे घेऊन दाविदाला शिव्याशाप दिले.
तो दाविदाला म्हणाला, “असा जवळ ये म्हणजे तुझे मांस आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देतो.”
तेव्हा दावीद त्या पलिष्ट्याला म्हणाला, “तू तलवार, भाला व बरची घेऊन माझ्यावर चालून आलास; पण इस्राएली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस; त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझ्याकडे आलो आहे.
आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल; मी तुझा वध करीन, व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज पलिष्टी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देईन; तेव्हा इस्राएलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीला कळून येईल;
आणि ह्या सगळ्या समुदायाला कळून येईल की परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही; कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे; तो तुम्हांला आमच्या हाती देईल.”
मग तो पलिष्टी उठून दाविदाशी सामना करायला जवळ आला, तेव्हा दावीद त्या पलिष्ट्याशी सामना करायला सैन्य होते त्या दिशेकडे त्वरेने धावला.
दाविदाने आपल्या बटव्यात हात घालून त्यातून एक गोटा घेऊन गोफणीत घातला, आणि ती गरगर फिरवून पलिष्ट्याच्या कपाळावर असा मारला की तो त्याच्या कपाळात घुसला आणि तो जमिनीवर पालथा पडला.
ह्या प्रकारे दाविदाने गोफणगुंडा घेऊन त्या पलिष्ट्यावर सरशी केली आणि त्याचा वध केला; दाविदाच्या हाती तलवार नव्हती.
दाविदाने धावत जाऊन त्या पलिष्ट्याच्या छातीवर पाय दिला व त्याचीच तलवार म्यानातून काढून त्याला ठार करून त्याचे शिर छेदले. आपला महावीर गतप्राण झाला हे पाहून पलिष्टी पळून गेले.
मग इस्राएल व यहूदी उठले आणि रणशब्द करत गथ व एक्रोन ह्यांच्या वेशीपर्यंत पलिष्ट्यांचा पाठलाग करीत गेले, आणि पलिष्टी शाराईमाच्या वाटेत गथ व एक्रोन येथवर घायाळ होऊन पडले.