पलिष्टी लोकांनी युद्धासाठी आपल्या सेना एकवट केल्या आणि यहूदा देशातील सोखो ह्या ठिकाणी जमून सोखो व अजेका ह्यांच्या दरम्यान अफस-दम्मीम येथे छावणी दिली. इकडे शौलाने आणि इस्राएल लोकांनीही एकवट होऊन एला नामक खोर्यात तळ दिला, आणि पलिष्ट्यांशी युद्ध करण्यास सैन्यरचना केली. पलिष्टी एका बाजूच्या पहाडावर उभे राहिले, व दुसर्या बाजूच्या पहाडावर इस्राएल लोक उभे राहिले; त्या दोन डोंगरांच्या मध्ये एक खोरे होते. तेव्हा गथ एथला गल्याथ नामक एक महावीर पलिष्ट्यांच्या छावणीतून बाहेर आला; त्याची उंची सहा हात एक वीत होती. त्याच्या डोक्याला एक पितळी टोप होता. त्याने खवल्यासारख्या पट्ट्यांचे कवच अंगात घातले होते; त्या कवचाचे वजन पाच हजार पितळी शेकेल होते. त्याने पायांत पितळी मोजे चढवले होते, व त्याच्या खांद्यांच्या दरम्यान एक पितळी बरची होती. त्याच्या भाल्याचा दांडा साळ्याच्या तुरीसारखा होता; त्याच्या भाल्याचे पाते सहाशे लोखंडी शेकेल होते; त्याची ढाल वाहणारा त्याच्यापुढे चालला होता. तो उभा राहून इस्राएल सैन्याला मोठ्याने हाक मारून म्हणाला, “तुम्ही येथे येऊन युद्धासाठी सैन्यरचना का केली आहे? मी पलिष्टी नव्हे काय? आणि तुम्ही शौलाचे नोकर ना? तुम्ही आपल्यांतला एक पुरुष निवडा, आणि त्याने माझ्याकडे यावे. त्याने माझ्याशी लढून मला ठार मारले तर आम्ही तुमचे दास होऊ; पण माझी त्याच्यावर सरशी होऊन मी त्याला मारले, तर तुम्ही आमचे दास होऊन आमची सेवा करावी.” तो पलिष्टी म्हणाला, “इस्राएलाच्या सर्व सैन्याला मी कस्पटासमान लेखत आहे. कोणाही पुरुषाला माझ्यापुढे येऊ द्या, म्हणजे आम्ही दोघे युद्ध करू.” शौल व सर्व इस्राएल ह्यांनी त्या पलिष्ट्याचे हे शब्द ऐकले तेव्हा त्यांचे धैर्य खचले आणि ते फार भयभीत झाले. आता यहूदातील बेथलेहेमच्या इशाय नामक एफ्राथ्याला दावीद नावाचा पुत्र होता. इशायास आठ पुत्र होते. तो शौलाच्या कारकिर्दीत वृद्ध व वयातीत झाला होता. इशायाचे तीन वडील पुत्र शौलाबरोबर लढाईला गेले होते. लढाईला गेलेल्या त्या तीन पुत्रांची नावे ही : ज्येष्ठ पुत्र अलीयाब, दुसरा अबीनादाब व तिसरा शाम्मा. सर्वांहून धाकटा दावीद होता; तिन्ही वडील पुत्र शौलाबरोबर गेले होते. दावीद हा बेथलेहेमात आपल्या बापाची शेरडेमेंढरे राखण्यासाठी शौलाकडून जातयेत असे. तो पलिष्टी चाळीस दिवसपर्यंत नित्य सकाळी व संध्याकाळी जवळ येऊन उभा राहत असे. इशायाने आपला पुत्र दावीद ह्याला म्हटले, “एक एफाभर हुरडा व ह्या भाकरी घेऊन छावणीत आपल्या भावांकडे लवकर जा; आणि हे खव्याचे दहा गोळे त्यांच्या सहस्रपतीस नेऊन दे; तुझे बंधू कसे आहेत ते पाहून त्यांच्याकडून काही खूण आण. शौल, तुझे भाऊ व सर्व इस्राएल लोक एला नामक खोर्यात पलिष्ट्यांशी युद्ध करीत आहेत.”
१ शमुवेल 17 वाचा
ऐका १ शमुवेल 17
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ शमुवेल 17:1-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ