YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 10:17-27

१ शमुवेल 10:17-27 MARVBSI

मग शमुवेलाने लोकांना मिस्पात परमेश्वरापुढे बोलावून जमा केले. तो इस्राएल लोकांना म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर असे म्हणतो, मी इस्राएलास मिसर देशातून बाहेर आणले आणि तुम्हांला मिसरी लोकांच्या हातांतून व तुम्हांला गांजणार्‍या सर्व राष्ट्रांच्या हातातून सोडवले. पण तुम्हांला सर्व विपत्तीतून व संकटातून सोडवणार्‍या तुमच्या देवाचा आज तुम्ही अव्हेर केला आहे, व तुम्ही त्याला म्हणाला आहात की हे ठीक नव्हे, आमच्यावर राजा नेमावा; तर आता वंशावंशांनी आणि हजाराहजारांनी परमेश्वरासमोर येऊन हजर व्हा.” शमुवेलाने सगळे वंश जवळ आणले, आणि बन्यामिनाच्या वंशाची चिठ्ठी निघाली. मग बन्यामिनी वंश कुळाकुळांनी जवळ आणला तेव्हा मात्रीच्या कुळाची चिठ्ठी निघाली; व शेवटी कीशाचा पुत्र शौल ह्याच्या नावाची चिठ्ठी निघाली; त्यांनी त्याला शोधले पण तो कोठे सापडेना. तेव्हा त्यांनी परमेश्वराला आणखी विचारले, “तो मनुष्य येथे आला आहे काय?” परमेश्वराने सांगितले, “पाहा, तो सामानसुमानात लपून राहिला आहे.” त्यांनी धावत जाऊन त्याला तेथून आणले, आणि तो लोकांमध्ये उभा राहिला तेव्हा तो उंच दिसला; सर्व लोक त्याच्या केवळ खांद्याला लागले. मग शमुवेल लोकांना म्हणाला, “परमेश्वराने ज्याला निवडले त्याला तुम्ही पाहत आहात ना? सर्व लोकांमध्ये त्याच्या बरोबरीचा कोणी नाही.” तेव्हा सर्व लोकांनी म्हटले, “राजा चिरायू होवो.” नंतर शमुवेलाने लोकांना राजनीती सांगितली व ती एका ग्रंथात लिहून तो ग्रंथ परमेश्वरापुढे ठेवून दिला. मग शमुवेलाने सर्व लोकांना आपापल्या घरी जाण्यास निरोप दिला. शौलही गिबा येथे आपल्या घरी गेला. ज्या सैनिकांच्या मनांस देवाकडून स्फूर्ती झाली ते त्याच्याबरोबर गेले. पण काही अधम लोक बोलले, “हा मनुष्य आमचा काय उद्धार करणार?” त्यांनी त्याला तुच्छ मानले आणि त्याला काही नजराणा आणला नाही; पण त्याने ते ऐकले न ऐकलेसे केले.