माणसांनी नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने ‘निवडलेला व मूल्यवान’ असा जो जिवंत ‘धोंडा’ त्याच्याजवळ येत असता,
तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात; ह्यासाठी की, येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.
कारण असा शास्त्रलेख आहे :
“पाहा, निवडलेली, मूल्यवान अशी कोनशिला मी
सीयोनेत बसवतो;
तिच्यावर विश्वास ठेवणारा फजीत होणार नाही.”
म्हणून तुम्हा विश्वास ठेवणार्यांना ती मूल्यवान आहे; परंतु जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना,
“बांधणार्यांनी नापसंत केलेला धोंडा
तोच कोनशिला झाला,”
आणि “ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला;”
ते वचन मानत नसल्यामुळे ठेचाळतात, त्यासाठी ते नेमलेही होते.
पण तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असे आहात; ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.’
ते तुम्ही पूर्वी ‘लोक नव्हता,’ आता तर ‘देवाचे लोक आहात; तुम्हांला दया मिळाली नव्हती,’ आता तर ‘दया मिळाली आहे.’
प्रियजनहो, जे तुम्ही ‘प्रवासी व परदेशवासी’ आहात त्या तुम्हांला मी विनंती करतो की, जिवात्म्याबरोबर लढणार्या दैहिक वासनांपासून दूर राहा.
परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांला दुष्कर्मी समजून तुमच्याविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून ‘समाचाराच्या दिवशी’ देवाचा गौरव करावा.
प्रभूकरता तुम्ही, माणसांनी स्थापलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा; राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन;
आणि अधिकारी हे वाईट करणार्यांना शिक्षा करण्यासाठी व चांगले करणार्यांची प्रशंसा करण्यासाठी त्याने पाठवलेले आहेत, म्हणून त्यांच्याही अधीन असा.
कारण देवाची इच्छा अशी आहे की, तुम्ही चांगले करत राहून निर्बुद्ध माणसांच्या अज्ञानाला कुंठित करावे.
दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करता तुम्ही स्वतंत्र, तरी देवाचे दास, असे राहा.
सर्वांना मान द्या. बंधुवर्गावर प्रीती करा. ‘देवाचे भय धरा.’ राजाचा मान राखा.
घरच्या चाकरांनो, तुम्ही पूर्ण भयाने आपल्या धन्यांच्या अधीन असा; जे चांगले व सौम्य त्यांच्याच केवळ नव्हे, तर जे कठोर त्यांच्याही अधीन असा.
जर कोणी अन्याय सोसताना देवाचे स्मरण ठेवून दुःखे सहन करतो तर ते उचित आहे.
कारण पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा? पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे.
कारण ह्याचकरता तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुमच्याकरता कित्ता घालून दिला आहे.
त्याने पाप ‘केले नाही, आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही.’
त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; दुःख भोगत असता त्याने धमकावले नाही; तर यथार्थ न्याय करणार्याकडे स्वतःला सोपवून दिले.
‘त्याने स्वतः तुमची आमची पापे’ स्वदेही ‘वाहून’ खांबावर ‘नेली’, ह्यासाठी की, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या ‘माराने तुम्ही निरोगी झाला आहात.’
कारण तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता; परंतु आता तुमच्या जिवांचा मेंढपाळ व संरक्षक1 ह्याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात.