YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 8:54-66

१ राजे 8:54-66 MARVBSI

शलमोनाने आकाशाकडे हात पसरून व परमेश्वराच्या वेदीसमोर गुडघे टेकून ही सर्व प्रार्थना व विनवणी परमेश्वराला करण्याचे संपवल्यावर तो तेथून उठला. त्याने उभे राहून सर्व इस्राएल मंडळीस उच्च स्वराने आशीर्वाद दिला; तो म्हणाला, “ज्या परमेश्वराने आपल्या वचनानुसार आपल्या इस्राएल लोकांना विसावा दिला तो धन्य! तो आपला सेवक मोशे ह्याच्या द्वारे जे वचन बोलला त्यातला एक शब्दही व्यर्थ गेला नाही. आपला देव परमेश्वर जसा आपल्या पूर्वजांबरोबर राहत असे तसाच तो आपल्याबरोबर राहो; तो आम्हांला न सोडो, तो आम्हांला न टाको; आम्ही त्याच्या सर्व मार्गांनी चालावे, त्याने आमच्या पूर्वजांना दिलेल्या सर्व आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळावेत म्हणून तो आमची मने आपल्याकडे लावो. ज्या शब्दांनी मी परमेश्वरापुढे विनंती केली आहे ते आपला देव परमेश्वर ह्याच्याजवळ रात्रंदिवस राहोत आणि प्रतिदिनी जरूर पडेल तसा तो आपल्या सेवकांना व आपल्या इस्राएल लोकांना न्याय देवो. ह्यावरून ह्या भूतलावरील सर्व राष्ट्रे समजतील की परमेश्वर हाच देव आहे; अन्य कोणी नव्हे. तर तुमचे मन आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे असे पूर्णपणे लागलेले असो की आजच्यासारखे त्याच्या नियमांप्रमाणे तुम्ही चालावे व त्याच्या आज्ञा पाळाव्यात.” मग राजाने व त्याच्याबरोबर सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वरासमोर यज्ञबली अर्पण केले. शलमोनाने शांत्यर्पणासाठी परमेश्वरापुढे अर्पण केलेले बळी बावीस हजार बैल आणि एक लाख वीस हजार मेंढरे होती. अशा रीतीने राजाने व सर्व इस्राएलांनी परमेश्वराच्या मंदिराचे प्रतिष्ठापन केले. त्या दिवशी राजाने परमेश्वराच्या मंदिराच्या पुढल्या अंगणामध्ये एक स्थान पवित्र करून होमबली, अन्नबली आणि शांत्यर्पणाची चरबी ही तेथेच अर्पण केली, कारण परमेश्वरासमोर असलेल्या पितळेच्या वेदीवर त्यांचा समावेश होईना. शलमोनाने व त्याच्याबरोबर सर्व इस्राएल लोकांनी त्या वेळी महोत्सव केला, हमाथाच्या घाटापासून मिसर देशाच्या नाल्यापर्यंत सर्व इस्राएल लोकांचा मोठा जमाव एक सप्तक व आणखी एक सप्तक म्हणजे एकंदर चौदा दिवस आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर उत्सव करीत राहिला. आठव्या दिवशी त्याने लोकांची रवानगी केली; ते सर्व राजाचे अभीष्ट चिंतून आपापल्या डेर्‍यांस गेले; आपला सेवक दावीद व आपले लोक इस्राएल ह्यांचे जे कल्याण परमेश्वराने केले त्यामुळे त्यांना आनंद वाटला व त्यांची मने हर्षभरित झाली.